Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra bandh: लखीमपूर खेरी हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचा बंद, कोण काय म्हणाले ?

Spread the love

मुंबई : उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खेरी येथे आंदोलक शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज दिलेल्या महारष्ट्र बंदला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान या प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना तातडीने आपल्या पदावरुन काढून टाकावे यासाठी काँग्रेसतर्फे राजभवानसमोर मूक  बंदवरून  महाविकास आघाडीचे नेते आणि भाजपनेते यांच्यात आरोप प्रत्यारोपाचा कलगीतुरा रंगला आहे. 

महाविकासआघाडीकडून पुकारण्यात आलेल्या बंदला राज्यभरात संमिश्र प्रतिसादमिळाला. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हा बंद यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. भाजपाकडून मात्र या बंदवरून महाविकासआघाडीवर जोरादार टीका करण्यात येत आहे. हा बंद म्हणजे ढोंगीपणा आहे, असे  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले  तर, फडणवीसांच्या या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी , “शेतकऱ्यांच्या हत्याऱ्यांना हा ढोंगीपणाच वाटणार” असे प्रत्युत्तर दिले.

कोण काय म्हणाले ?

नाना पटोले यांनी आजच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पत्रकारपरिषदेत बोलताना सांगितले की, “महाराष्ट्राच्या जनतेने बंदला जो प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. भाजपाने ज्या पद्धतीने या बंदला विरोध केला, खऱ्या अर्थाने उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या घटनेचे, या देशाच्या अन्नदात्यावर गाडी चालवून त्यांना जीवे मारणे आणि या  व्यवस्थेला महाराष्ट्र भाजपाने समर्थन करणे  ही बाब निषेधार्ह आहे. म्हणून आज ज्या पद्धतीने भाजपाने आजच्या बंदला विरोध केला, त्याचाही आम्ही निषेध करतोय. आजचा बंद हा चांगल्या पद्धतीने व शांततेत झालेला आहे. त्यामुळे जनतेचे  समर्थन, महाविकासआघाडीच्या बरोबर आहे हे देखील सिद्ध झाले  आणि भाजपाचा विरोध, आज पूर्ण राज्यात आपल्याला पाहायला मिळालेला आहे.”

खा. असदुद्दीन ओवेसी

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी चार जण हे शेतकरी होते. या शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर प्रकरण चांगलेच तापले आहे. या हिंसाचारात केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलावर शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप करण्यात येत असून शनिवारी त्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे सर्वच विरोधी पक्षांकडून केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारवर टीका केली जात आहे. आता या प्रकरणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनएमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही  केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

ओवैसी यांनी म्हटले आहे कि , या पीएम मोदी आशिषच्या अब्बाजानला ( वडिलांना ) पदावरून कधी हटवणार? असा सवाल ओवेसी यांनी बलरामपूरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना उपस्थित केला. तसेच भाजपाने कमळाऐवजी ‘थार’ (ज्या वाहनाने शेतकऱ्यांना चिरडलं) हे पक्षाचे  चिन्ह म्हणून वापरावे , असा उपरोधक टोलाही ओवेसींनी मारला. पुढे ते म्हणाले की, जर आरोपीचे नाव आशिषऐवजी अतिक असते, तर २ मिनिटात त्याच्या घरावर बुलडोझर चालवला असता. दरम्यान, ओवेसी यांनी यापूर्वीही लखीमपूर प्रकरणावर संताप व्यक्त करत भाजपा सरकारवर टीका केली होती.

‘खूनाच्या आरोपीला तुम्ही १० वेळा खायला घालता?’

“केंद्रीय मंत्र्यांच्या भाषणानंतर हा हिंसाचार झाला आहे आणि त्यानंतर खूप वेळानंतर मंत्र्यांच्या मुलाला अटक करण्यात आली. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्यानंतर पोलीस त्याला बोलवतात. तपासाच्या ११ तासांमध्ये १० वेळा नाष्टा दिला जातो. खूनाच्या आरोपीला तुम्ही १० वेळा खायला घालता? तो पोलिसांकडे नाही तर सासूरवाडीला गेला होता असे वाटत होते. मंत्र्यांनी सुद्धा कबुल केले आहे की ती आमची गाडी होती. भाजपा सरकार कोणाला मूर्ख बनवत आहे. नरेंद्र मोदी किंवा योगी आदित्यनाथ मिश्रा यांचा संबंध एका उच्च जातीसोबत असल्याने त्यांना वाचवत आहे. भाजपा पूर्णपणे त्यांना वाचवत आहे,” असे ओवेसी म्हणाले होते.

स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

लखीमपुर-खीरी या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र या बंदला विरोध करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा बंद सरकारी दहशतवाद असल्याची टीका महाविकास आघाडी सरकारवर केली आणि याच टीकेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उत्तर देत लखीमपूर या ठिकाणी झालेली घटना ही सरकारी दहशतवाद नव्हता का असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे तर महाविकास आघाडी सरकारचे आणि आमचे काही मतभेद असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी हा बंद मह विकास आघाडी सरकारने पुकारला त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे असे देखील राजू शेट्टी म्हणाले.

औरंगाबादमध्ये कडकडीत बंद

महाविकास आघाडीच्यावतीने पुकारलेल्या बंदला आज औरंगाबादमध्ये चांगला  प्रतिसाद दिसून आला. या बंदमध्ये व्यापाऱ्यांनी कुठलीही भूमिका घेतली नाही. व्यापारी आघाडीच्या वतीने आम्ही बंदमध्ये सहभागी होणार नाही, मात्र ज्या व्यापाऱ्यांना बंद करायचा असेल ते बंद पाळू शकतात अशी भूमिका जाहीर करण्यात आली होती. सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास महा विकास आघाडीचे नेते पैठण गेट पासून रस्त्यावर उतरले. त्यांनी सुरू असलेल्या दुकान बंद करण्याचे आव्हान केले. तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी आक्रमक होत, दुकाने देखील बंद केली. पैठणगेट ते शहागंज असा मोर्चा काढत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आजच्या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले  होते. या बंदला आधी व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र, नंतर नरमाईची भूमिका घेत बंदला पाठिंबा असल्याचे व्यापाऱ्यांनी जाहीर केले आहे.

बंद मोडून काढण्याची भाषणा करणारे मूर्ख  : खा . संजय राऊत

यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे कि ,  बंद मोडून काढण्याची भाषणा करणारे मूर्ख आहेत. शेतकऱ्यांचा रोष आणि संताप समजून घेण्याची गरज आहे. बंद मोडून काढण्याची भाषा करणारे मूर्ख आहेत. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडणाऱी जीप महाराष्ट्रात असेल तर आणावी रस्त्यावर, असे  म्हणत राऊत यांनी थेट भाजपाला आव्हान दिले आहे. लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद केला. बंद १०० टक्के यशस्वी आहे. किरकोळ घटना घडल्या असतील तर बंद असताना जगभरात घडतात. शेतकरी न्यायाच्या प्रतिक्षेत असून शेतकऱ्यांना चिरडण्याच्या प्रवृत्तीविरोधात आमचा विरोध आहे. आज संपूर्ण देश महाराष्ट्राकडे पाहत आहे, असेही राऊत यांनी म्हटलं आहे.

भाजपाकडून शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचं अप्रत्यक्ष समर्थन : जयंत पाटील

“महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि आमचे मित्र पक्ष यांच्यावतीने हा बंद आम्ही पुकारला आहे. या बंदचं कारण म्हणजे भाजप आजपर्यंत देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत होती. दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. भाजपला त्यांचं राजकीय मत आग्रहाने मांडायचं आहे हे समजू शकतो, पण लखीमपूरसारखी घटना जाणीवपूर्वक केलेलं हत्याकांड आहे,” असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांना चिरडणे  म्हणजे सत्तेची मस्ती : सुप्रिया सुळे

“ही सत्तेची मस्ती आहे बाकी काही नाही. तुम्ही तो शेतकऱ्यांना चिरडण्याचा व्हिडीओ पाहा, तुम्हाला त्यात माणूसकी दिसते आहे का? पत्रकार असो, समाजकारणी असो पण सर्वात आधी आपण माणसं आहोत. हे चुकीचं आहे, क्रुरता आहे हे तुम्हाला वाटत नाही का? कुणाचंही सरकार असो उत्तर प्रदेशमध्ये जी कृती झाली ती निंदाजनक आहे. केंद्र सरकारने भारताच्या नागरिकांना, शेतकऱ्यांना न्याय द्यावा,” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

हे तर ढोंगी सरकार : देवेंद्र फडणवीस

या बंद संदर्भात बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे ढोंगी सरकार आहे. लखीमपूरसाठी बंद केला जातो पण राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत केली नाही. भारतीय जनता पार्टीचे  सरकार बरे  होते  असे शेतकरी बोलत आहेत आताचे  सरकार हे ढोंगीबाज आहे. फडणवीस पुढे म्हणाले की, हे तेच सरकार आहे ज्यांनी पाण्यासाठी मावळला शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. बंद जबरदस्तीने केला गेला. दमदाटी करून, प्रशासनाचा वापर, धमकी देऊन बंद केला आहे. सरकार पुरस्कृत हा बंद आहे. कारण ईस्टर्न फ्री वे वर दहा कार्यकर्ते उपस्थित होते आणि पोलीस तमाशा पाहात होते.

बंद यशस्वी करण्याचा सरकारचा केविलवाणा प्रयत्न : प्रवीण दरेकर

महाराष्ट्रात असा सरकारपुरस्कृत बंद कधीच झाला नाही. महाराष्ट्र बंदसाठी सरकारी यंत्रणांकडून दबाव आणण्याचं काम मविआ नेते,पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून होत आहे. लखीमपुर येथे झालेली घटना वाईट आहे त्याचा निषेध आम्ही व्यक्त करतो. संपूर्ण देश या घटनेचा निषेध व्यक्त करत आहे. परंतु केवळ राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारकडून लखीमपुरच्या घटनेचा वापर होत असल्याची टीका आज विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

राज्य सरकारला शेतकऱ्यांबद्दल प्रेम नाही -चंद्रकांत पाटील

दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. कोल्हापुरात बोलताना ते म्हणाले की, राज्य सरकारला शेतकऱ्यांबद्दल प्रेम नाही, महाराष्ट्रात जी कारवाई सुरू आहे त्यावरून लक्ष वेधण्यासाठी हा बंद केला जातोय. लखीमपूरमध्ये जी घटना घडली त्याला भाजपला का लेबल लावले  जात आहे. मावळमध्ये तर पोलिसांनी शेतकऱ्यांना शोधून शोधून मारले  होते . याठिकाणी एका व्यक्तीने ही घटना घडवली आहे. त्याची चौकशी करावी आणि कारवाई करावी. शेतकऱ्यांनी देखील गाडीतील चार जणांना ठेचून ठेचून मारले.

 

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!