Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNCBNewsUpdate : आम्ही ३ नव्हे ६ लोकांना सोडले , नवाब मलिकांच्या आरोपावर एनसीबीचे उत्तर

Spread the love

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांची दखल घेत नवाब मलिक यांची पत्रकार परिषद होताच , एनसीबी हि प्रोफेशनल आणि स्वतंत्र संस्था आहे आम्ही कुणाच्याही दबावाखाली नव्हे तर कायद्याने काम करतो असे सांगत आम्ही केवळ ३ लोकांना नव्हे तर ६ लोकांना पुराव्याअभावी सोडल्याची कबुली नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी दिली आणि मलिक यांचे सर्व आरोप फेटाळून लावले.

एनसीबीने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझवर टाकलेल्या छाप्यात एनसीबीने एकूण ११ जणांना ताब्यात घेतले होते आणि त्यातील तीन जणांना नंतर सोडण्यात आले, असा दावा करत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

दरम्यान एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह आणि मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेत मलिक यांनी केलेल्या आरोपांवर एनसीबीची बाजू स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एनसीबीवर जे आरोप करण्यात आले आहेत ते निराधार आहेत. एका निष्पक्ष यंत्रणेवर असे आरोप करणे ही खेदाची बाब आहे. एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी क्रूझवर जो छापा टाकला होता, ती कारवाई नियमांनुसारच करण्यात आलेली आहे. या प्रकरणात चौकशीनंतरच आरोपींना अटक करण्यात आली आहे, असे ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले. एनसीबी ही व्यावसायिकपणे काम करणारी तपास यंत्रणा आहे. आमच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे क्रूझवर छापा टाकला. यात एकूण १४ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर चौकशीत ज्यांच्याबाबत कोणताही पुरावा आढळला नाही त्या ६ जणांना सोडण्यात आले तर अन्य आठ जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली, असेही सिंह यांनी नमूद केले.

नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप खोटे

आमचा कुणाविषयीसुद्धा आकस नाही . नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत. भाजपशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला सोडण्यात आलेले नाही. व्यक्ती कोण आहे हे पाहून एनसीबी काम करत नाही, असे सिंह यांनी स्पष्ट केले. एकूण ९ पंच साक्षीदार या प्रक्रियेत होते. त्यात मनीष भानुशाली आणि के. पी. गोसावी यांचाही समावेश होता. हे पंच कारवाईवेळी आमच्या पथकासोबत होते. हा छापा टाकण्यापूर्वी यातील कोणत्याही पंचाशी आमचा कोणताही अधिकारी संपर्कात नव्हता, असेही सिंह यांनी स्पष्ट केले. क्रूझवरील कारवाईत अटक करण्यात आलेल्या व एनसीबी कोठडीत असलेल्या कोणत्याही आरोपीला चुकीचा वागणूक देण्यात आलेली नाही. कायद्याच्या चौकटीत राहूनच त्यांची चौकशी सुरू आहे, असेही सिंह यांनी सांगितले.

मलिक यांचे काय आरोप होते ?

दरम्यान, नवाब मलिक यांनी आज दुसऱ्यांदा या प्रकरणावर पत्रकार परिषद घेतली व एनसीबीवर नव्याने आरोप केले. ही कारवाईच फेक असल्याचा दावा करणाऱ्या मलिक यांनी आज आणखी तीन नावे घेत एनसीबीला लक्ष्य केले. एनसीबीने क्रूझवरील छाप्यात एकूण ११ जणांना ताब्यात घेतले होते. त्यातील रिषभ सचदेव, प्रतीक गाबा आणि आमीर फर्निचरवाला या तीन जणांना त्याच रात्री सोडण्यात आले होते. त्यांना कोणत्या कारणामुळे ताब्यात घेतले आणि कोणत्या कारणामुळे सोडले , याचं उत्तर एनसीबीने द्यायचा हवे. यातील रिषभ सचदेव हा भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज भारतीय यांचा मेव्हणा आहे. तर प्रतीक गाबा आणि फर्निचरवाला यांच्या बोलावण्यावरूनच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान या पार्टीला गेला होता, असा दावा मलिक यांना केला.

दरम्यान भाजपच्या नेत्यांचे फोन गेल्यानंतर सचदेव व अन्य दोघांना सोडण्यात आले आहे. त्यामुळे रिषभ सचदेवचे वडील आणि समीर वानखेडे यांचे फोन कॉल डीटेल्स तपासले गेले पाहिजेत, अशी मागणी मलिक यांनी केली. यावर बोलताना समीर वानखेडे म्हणाले कि , न्यायालय जो आदेश देईल तो आम्हाला मान्य असेल. इतर कुणालाही आम्ही बांधील नाही. ज्यांनी आमच्यावर आरोप केले तो त्यांचा अधिकार आहे. त्यावर आम्ही काहीही बोलू शकत नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!