MaharashtraNewsUpdate : पवार कुटुंबियांवरील धाडीवर शरद पवारांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया….

बारामती : पवार कुटुंबियांशी संबंधित व्यक्तींवर आणि उद्योगांवर आयकर खात्याने टाकलेल्या धाडींबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि, एखाद्या विषयाबाबत जर शंका असेल तर त्यासंदर्भात चौकशी करण्याचा अधिकार यंत्रणांना आहे. पण अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या घरी छापे टाकणे हा केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाराचा अतिरेक आहे.
बारामतीतील गोविंदबागेत पवार पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान या धाडीनंतर अद्याप चौकशी अजूनही सुरु आहे. या चौकशीनंतर सविस्तर बोलता येईल, असेही पवार पुढे म्हणाले. यावेळी त्यांनी या छापेमारीचा संबंध उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घातल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेशी जोडला आहे. उत्तरप्रदेशात शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्यात आले. त्या प्रकाराची तुलना मी जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. त्याचाच संताप किंवा राग सत्ताधाऱ्यांना आला असावा आणि आजची कारवाई ही त्यावरील प्रतिक्रिया असावी, ही शक्यता नाकारता येत नाही, असेही पवार पुढे म्हणाले.
दरम्यान अशा प्रकारे छापेमारी करणे हा अधिकाराचा अतिरेक असल्याचे अधोरेखित करतानाच अधिकाराचा असा गैरवापर किती दिवस सहन करायचा याचा आता लोकांनीच विचार केला पाहिजे असेही पवार यांनी म्हटले आहे. काही लोक भाषणांद्वारे आरोप करतात, तर काही लोक पत्रकार परिषदा घेवून आरोप करत असतात. ते बोलल्यानंतर केंद्रीय यंत्रणा कारवाई करण्यासाठी पुढे येतात आणि ही आक्षेपार्ह बाब आहे, असेही पवार म्हणाले.
कुठे कुठे चालू आहे कारवाई ?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित आणि त्यांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांवर गुरुवारी सकाळपासूनच ही छापेमारी सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पावर यांच्या मुंबईतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून छापे टाकरण्यात आले. बारामतीतील औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीसह पवारांच्या गाव असलेल्या काटेवाडी येथेही केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी करण्यात आली आहे. कंपनीवरती आयकर विभागाकडून तर काटेवाडी येथे ईडीच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या नातेवाईकांवर देखील छापेमारी सुरु आहे. यामध्ये अजित पवार यांच्या तीन बहिणींचाही समावेश आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून कारवाई केली जात आहे. साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. फक्त जरंडेश्वरच नाही तर दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याचं कळत आहे. हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे असल्याचं कळत आहे. दरम्यान, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावर देखील प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे.
सकाळी ६ वाजेपासून ही कारवाई करण्यात येत आहे. तब्बल १२ तास प्राप्तिकर विभागाने ही चौकशी केली आहे. सकाळपासून अतित पवार यांच्या बहिणी आणि संबधिक कंपन्यांवर छापेमारी झाली होती. मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयावर ही छापेमारी करण्यात आली. सात ते आठ अधिकाऱ्यांनी ही चौकशी केली आहे. अजित पवार यांची बहीण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशन हाऊसवर देखील प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. आयकरच्या चार अधिकाऱ्यांकडून मुक्ता पब्लिकेशनमध्ये कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. विजया पाटील यांच्या कोल्हापुरातील घरावर देखील आयकरचे अधिकारी पोहचले आहेत. तर विजया पाटील या पुईखडी इथल्या घरात उपस्थित आहेत.
अजित पवार यांची नाराजी
या कारवाईवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली असून नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले कि , माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली याचे काही वाटत नाही. पण फक्त रक्ताचं नातं आहे म्हणून राजकारणाशी, कंपन्यांशी दुरान्वये संबंध नसलेल्या माझ्या बहिणींवर कारवाई केली जाते याचं वाईट वाटतं, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी जाहीर केली आहे.
“राजकीय हेतूने ही धाड टाकली की आणखी काय माहिती हवी होती हे प्राप्तिकर विभागच सांगू शकेल. माझ्याशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांवर धाड टाकली याबाबत मला काही म्हणायचे नाही, कारण मी पण एक नागरिक आहे. फक्त एका गोष्टीचं वाईट वाटतं की माझी कोल्हापूरची एक आणि पुण्यातील दोन अशा तीन बहिणी ज्यांची ३५, ४० वर्षापूर्वी लग्नं झाली आणि संसार सुरु आहे त्यांच्यावरही कारवाई सुरु आहे. आता यामागचं कारण मात्र मला समजू शकलं नाही. कारण त्या व्यवस्थितपणे आपलं आयुष्य जगत आहेत. त्यांच्या मुलांची, मुलींची लग्न झाली असून नातवंडंदेखील आहेत. असं असताना त्यांचा तसं पाहिलं तर अजित पवारचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल तर राज्यातील जनतेने कोणत्या स्तराला जाऊन वेगवेगळ्या संस्थांचा वापर केला जात आहेया गोष्टीचा नक्की विचार केला पाहिजे.
इतक्या खालच्या पातळीला जाऊन राजकारण…
इतर संस्था, कंपन्यांवर कारवाई केली याबाबत मला काही म्हणायचे नाही. त्यांना जे हवे ते करु शकतात. पण ज्यांचा संबंध नाही त्यांच्याबद्दल मात्र वाईट वाटते . इतक्या खालच्या पातळीला जाऊन कोणी राजकारण करु शकते ? हे मला आजपर्यंत कळलेलं नाही, अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. अनेक सरकारे येत असतात, जात असतात..पण जनताच सर्वस्व असते. गेल्यावेळी निवडणुकीच्या काळात शरद पवारांचा एका बँकेशी काही काडीचा संबंध नसताना ईडीने नोटीस पाठवली होती. त्यातून बरंच काही रामायण किंवा राजकारण घडलं म्हणा,” याची आठवण करुन देताना अजित पवारांनी प्राप्तिकर विभागाच्या धाडी पडल्या हे वृत्त खरे असल्याचे माध्यमांना सांगितले.