MaharashtraCrimeUpdate : धक्कादायक : अपहृत बालकाचा हळदी -कुंकू लावलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह !!

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील कापशीत दोन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या सहा वर्षीय बालकाचा मृतदेह आढळला असून त्याच्या अंगावर जखमा आणि हळदी कुंकू असल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या धक्कादायक प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी कि , शाहूवाडी तालुक्यातील कापशी येथील आरव राकेश केसरे हा सहा वर्षीय बालक घराच्या दारात खेळत असताना दोन दिवसापूर्वी त्याचे अपहरण झाले होते. त्यामुळे शाहूवाडी पोलीस गावातील विविध ठिकाणी त्याचा शोध घेत होते. दरम्यान मंगळवारी सकाळी आरव याचा मृतदेह घराच्या मागील बाजूस आढळला. त्याच्या अंगावर बऱ्याच ठिकाणी जखमा होत्या आणि अंगावर हळदीकुंकूही लावल्याचे दिसत होते. यामुळे हा नरबळीचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान सकाळी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापुरातील सरकारी रुग्णालयात नेण्यात आला. तेथून तो त्याच्या पालकांना देण्यात आला. हा नरबळी आहे की आणखी काही याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. कागल तालुक्यातील सावर्डे येथेही महिन्यापूर्वी असाच प्रकार घडला होता. त्याबाबत अजूनही पोलिसांचा तपास सुरू आहे. तो तपास पूर्ण होण्यापूर्वीच वारणा कापशी खोऱ्यात नरबळीचा नवा प्रकार उघडकीस आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, कापशी येथे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, उपविभागीय पोलिस अधीक्षक रवींद्र साळोखे, शाहूवाडीचे पोलिस निरीक्षक विजय पाटील, कोडोली सहायक पोलिस निरीक्षक दिनेश काशीद, कळे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद सुर्वे, फॉरेन्सिक लॅब श्वानपथक सर्व यंत्रणा गावात उपस्थित आहे.