Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यनची रात्र गेली एनसीबी कोठडीत , आज जामीन अर्जावर सुनावणी

Spread the love

मुंबई :  मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह तीन जणांची एनसीबी कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या तिघांनाही किला कोर्टात हजर करण्यात आले होते. दरम्यान, मुंबईजवळ समुद्रात या क्रूझवर शनिवारी रात्री ड्रग्ज पार्टी सुरू असतानाच एनसीबीने छापा टाकला होता व आर्यनसह एकूण आठ जणांना ताब्यात घेतले होते. त्यातील आर्यन, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा या तीन जणांना चौकशीनंतर अटक करण्यात आली.

या प्रकरणात एनसीबीने किला कोर्टात  आर्यन, अरबाज आणि मूनमून या तिघांची अधिक चौकशी करायची असल्याने  एक दिवसाच्या कोठडीची मागणी केली. आरोपी हे ड्रग्ज पुरवठादारांशी व्हॉट्सअॅप चॅटच्या माध्यमातून सतत संपर्कात असल्याचे आढळून आले आहेत . मोबाईल फोनमधून त्याचे पुरावे मिळाले असल्याचे एनसीबीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर अ‍ॅड. सतीष मानेशिंदे यांनी आर्यनची बाजू मांडली. दरम्यान दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आर्यन व अन्य दोघांना एक दिवसाची कोठडी सुनावली. आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला असून उद्या त्या अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

एनसीबीच्या कारवाईत होता २२ जणांचा सहभाग

एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार , मुंबई येथून गोवा येथे जात असलेल्या कॉर्डेलिया या आलिशान क्रूझवर एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीसाठी आयोजकांनी ८० हजार ते दोन लाखांपर्यंत शुल्क आकारले होते. या हायप्रोफाइल पार्टीत ड्रग्जचा पुरवठा करण्यात आल्याची पक्की खबर एनसीबीला मिळाली होती. त्यामुळे एनसीबीची टीम आधीपासूनच या पार्टीच्या मागावर होती. एनसीबीने आधीच सापळा रचला होता. एनसीबीने पार्टीच्या तिकीट खरेदी केल्या होत्या. त्यानंतर २२ जणांचे पथक प्रवासी बनून या क्रूझवरील पार्टीत पोहचले. शनिवारी रात्री क्रूझवर पार्टी रंगात आली असतानाच या पथकाने कारवाई करत ही पार्टी उधळली. या कारवाईत कोकेन, एमडी, चरस, गांजा असे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्याआधारेच शाहरुखचा मुलगा आर्यनसह ८ जणांना ताब्यात घेण्यात आले होते.

दरम्यान  या ड्रग्ज पार्टी प्रकरणी  नुपूर सतिजा, इश्मितसिंग चड्ढा, मोहक जयस्वाल, गोमित चोप्रा आणि विक्रांत छोकर पाच जणांनाही एनसीबीने अटक केली असून  या सर्वांची उद्या प्रथम वैद्यकीय चाचणी करण्यात येईल आणि नंतर त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात येईल, असे एनसीबीकडून सांगण्यात आले आहे. या सर्वांच्या तपासातून महत्त्वाची माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.

आर्यनच्या बाबतीत एनसीबीचे म्हणणे असे आहे

मुंबई ते गोवा क्रूझवरील ड्रग्ज पार्टीतून अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्याकडे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि रोकड सापडली असून  याबाबतचा तपशील एनसीबीच्या अ‍ॅरेस्ट रिपोर्टमधून समोर आला आहे. हा ‘अ‍ॅरेस्ट मेमो’ आर्यन याने मान्य केला आहे.  आता एनसीबीच्या अ‍ॅरेस्ट रिपोर्टमधील माहिती हाती आली असून त्यात आर्यनकडे आढळलेले  ड्रग्ज आणि रोकड याचा तपशील देण्यात आला आहे. या अहवालानुसार आर्यनकडून १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या (एस्कॅटसी) २२ पील्स व रोख १.३३ लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. ड्रग्ज सेवन करण्याबरोबरच ड्रग्ज खरेदी आणि विक्रीचा आरोपही आर्यनवर ठेवण्यात आला आहे.

मुंबई एनसीबीच्या कार्यालयातील झोनल अधिकारी विश्व विजय सिंह यांनी ही कारवाई केली असून आर्यनवर एनडीपीसी अ‍ॅक्ट १९८५ च्या कलम ८ सी, २० बी, २७ व ३५ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील ग्रीन गेट येथील इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल येथे ही कारवाई करण्यात आल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. कारवाईचा तपशील नमूद असलेली प्रत आर्यनलाही देण्यात आली असून त्यावर अटकेचे कारण मला सांगण्यात आले आहे व मी ही माहिती मोबाइलवरून कुटुंबीयांना कळवल्याचे नमूद करत त्याखाली आर्यनने स्वाक्षरी केली आहे. दरम्यान, हा तपशील समोर आल्यानंतर आर्यनच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

१५ दिवसांपूर्वीच मिळाली होती माहिती

आपल्या प्राथमिक जबाबात आर्यनने , या पार्टीला मला गेस्ट म्हणून बोलावले होते. मी तिथे पैसे देऊन गेलो नाही. ड्रग्ज खरेदी-विक्रीशीही माझा काही संबंध नाही, असे म्हटले होते . प्रत्यक्षात त्याच्याकडून मोठी रोख रक्कम आणि ड्रग्ज सापडल्याचे व ड्रग्ज खरेदी-विक्रीचे पुरावेही आढळल्याचे एनसीबीच्या रिमांड कॉपीत नमूद करण्यात आले आहे.

‘क्रूझवर अशाप्रकारे ड्रग्ज पार्टी होणार असल्याची गोपनीय खबर आम्हाला १५ दिवसांपूर्वीच मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सातत्याने मागावर राहून आमच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली’, असे एस. एन. प्रधान यांनी नमूद केले. एनसीबीचे २२ अधिकारी प्रवासी बनून या क्रूझवर गेले होते, अशी माहितीही त्यांनी दिली. क्रूझवर उपस्थित १८०० जणांमधून ८ जणांनाच ताब्यात घेण्यात आले आहे. म्हणजे या आठ जणांकडे निश्चितच काही तरी सापडले असेल म्हणून ही कारवाई झाली आहे, असे प्रधान पुढे म्हणाले. या ड्रग्ज पार्टीत ज्या ज्या व्यक्तींचा सहभाग आढळले त्या सर्वांची चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  या क्रूझवरील पार्टीसाठी ८० हजार ते दोन लाखांपर्यंत मोठे शुल्क ठेवण्यात आले होते. त्यामुळेच या हायप्रोफाइल पार्टीबाबत तपासातून अनेक धक्कादायक बाबी पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!