Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : लखीमपूर खीरी भागात मोठा तणाव , प्रियांका गांधी यांची पोलिसांशी झटापट, अखेर मंत्रीपुत्रासह १४ जणांविरुद्ध खुनाचे गुन्हे

Spread the love

नवी दिल्ली :  उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी भागात शेतकरी आंदोलनाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात ८ लोक ठार झाल्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली आहे. दरम्यान या गावात आंदोलकांना भेटण्यासाठी जाणाऱ्या काँग्रेस नेत्या  प्रियांका गांधी यांची पोलिसांसोबत चांगलाच वादविवाद झाल्याने काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. काल रविवारी  आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना मंत्रीपुत्र आशिष मिश्रा याने  आंदोलकांना आपल्या गाडीखाली चिरडल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. 

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना मंत्रीपुत्र आशिष मिश्रा याने  आंदोलकांना आपल्या गाडीखाली चिरडल्याचा आरोप करण्यात येत असून  या हिंसेत चार शेतकऱ्यांसह आठ जण ठार झाले आहेत. यानंतर दोषींना अटक करण्यात यावी, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. दुसरीकडे, भाजप मंत्र्यांकडूनही पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘काही शेतकरी शांतीपूर्ण पद्धतीने  विरोध प्रदर्शन करत असल्याची सूचना आम्हाला मिळाला होती. त्यामुळे आम्ही रस्ता बदलला. याच दरम्यान, शेतकऱ्यांत लपलेल्या काही अराजक तत्त्वांनी भाजप कार्यकर्त्यांवर लाठ्या काठ्यांनी हल्ला केला. या घटनेचा एक व्हिडिओही आमच्याकडे आहे’, असे  केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा यांनी या घटनेबद्दल म्हटले आहे.

अटक नाही तोवर मृतांवर अंत्यसंस्कार नाही…

पोलिसांनी या प्रकरणात मंत्री पूत्र आशिष मिश्रा यांच्यासह १४ लोकांविरुद्ध भादंवि ३०२ , १२० (ब ) अन्वये गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे ‘जेव्हापर्यंत दोषीला अटक होत नाही तेव्हापर्यंत लखीमपूर खीरीमध्ये शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार नाहीत’, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. या घटनेमुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी देशभरात तीव्र आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

प्रियांका गांधी यांची अधिकाऱ्यांशी शाब्दिक चकमक

दरम्यान  या प्रकरणात लखीमपूरला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांची पुन्हा एकदा उत्तर प्रदेश पोलिसांशी शाब्दिक चकमक उडाली.  यावेळी पोलिसांनी प्रियांका गांधी यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेंव्हा ,  ‘हॅलो सीओ साहेब, ऑर्डर कुठंय? ऑर्डर काढा’ असे प्रश्न प्रियांका गांधी यांनी पोलिसांना विचारले  मात्र, तरीही  उत्तर पोलिसांकडून प्रियांका यांना ताब्यात घेतले.

मला हात तर लावून दाखवा….

यावेळी बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या कि , भाजप सरकारकडून शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचे राजकारण सुरू आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही मला धक्का दिला, जबरदस्तीने  घेऊन जाण्याचा प्रयत्न केला ती शारीरिक हिंसा आहे. हा अपहरणाचा प्रयत्न ठरू शकतो. मी समजावते, मला हात तर लावून दाखवा. जाऊन अगोदर आपल्या अधिकाऱ्यांकडून, मंत्र्यांकडून वॉरंट घेऊन या… ऑर्डर घेऊन या… अटकेसाठी महिला पोलिसांना पुढे करू नका. महिलांशी कसे  बोलावे  हे अगोदर शिकून या’ असेही यावेळी प्रियांका गांधी पोलिसांना दरडावून सांगताना दिसल्या.

आपली झेड सिक्युरिटी मागे सोडून एका ड्रायव्हरसरहीत प्रियांका गांधी यांनी चार तास नवी दिल्लीकडून लखीमपूरकडे जाण्याचा प्रयत्न केला. सकाळी साडे पाच वाजल्या दरम्यान त्यांना लखीमपूर खीरी पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री १२.०० वाजल्यापासून ५.३० वाजेपर्यंत प्रियांका गांधी आणि प्रशासनाचा लपाछपीचा खेळ सुरू होता. यानंतर पोलीस प्रियांका गांधी यांना बटालियन गेस्ट हाऊसमध्ये घेऊन गेले.

राहुल गांधींकडून बहिणीला प्रोत्साहन

लखीमपूरला जाणाऱ्या प्रियांका गांधी यांना पोलिसांकडून रोखण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या बहिणीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. ‘प्रियांका मला माहीत आहे की तू मागे फिरणार नाहीस. ते तुझ्या हिंमतीला घाबरले आहेत’ असे  ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

दरम्यान अनेक विरोधी पक्षांचे नेते आज लखीमपूरकडे रवाना झाले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हेदेखील आज लखीमपूर खीरीकडे रवाना होण्यासाठी लखनऊ स्थित आपल्या निवासस्थानातून बाहेर पडताच पोलिसांनी त्यांना रोखले आणि ताब्यात घेतले असल्याचे वृत्त आहे. या दरम्यान समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना जोरदार गोंधळ घालण्यात आला. अखिलेश यादव यांनी आपला लखीमपूर खीरी दौरा जाहीर केल्यानंतर यांच्या घराबाहेर रात्रीपासूनच मोठ्या संख्येत पोलीस दल तैनात करण्यात आलंय. अखिलेश यादव यांचा रस्ता रोखण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावरच एक मोठा ट्रक उभा केला होता. सोबतच, बॅरिकेडिंगही उभारण्यात आलं होतं.

बसपा नेतेही नजर कैदेत

बहुजन समाज पक्षाचे महासचिव सतीश चंद्र मिश्र यांनाही पोलिसांनी नजरकैदेत ठेवले असल्याचे ट्विट बसपा नेत्या मायावती यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे कि ,  ‘बसपाचे राष्ट्रीय महासचिव आणि राज्यसभा खासदार एस सी मिश्र यांना रात्री उशिरा लखनऊमध्ये त्यांच्या निवासस्थानी नजरकैद करण्यात  आले आहे. त्यामुळे पक्षाचे  प्रतिनिधिमंडळ लखीमपूर खीरी जाऊन शेतकरी हत्याकांडाबद्दल अधिक माहिती घेऊ शकले नाहीत. हे अत्यंत दु:खद आणि निंदनीय आहे’.दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनाही पोलिसांनी चेकिंग दरम्यान रोखण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!