Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : ज्येष्ठ विनोदी लेखक प्राध्यापक द.मा.मिरसदार यांना अनेक मान्यवरांची आदरांजली

Spread the love

पुणे : ज्येष्ठ विनोदी लेखक प्राध्यापक द.मा.मिरसदार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ९४ वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.

द.मा. मिरासदार यांचा जन्म १४ एप्रिल १९२७ साली झाला. साहित्य क्षेत्रात येण्याआधी ते पुण्यात पत्रकार होते. अनेक वर्ष त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी काम केले होते. त्यानंतर १९६१ ते १९८७ पर्यंत औरंगाबादमधील देवगिरी महाविद्यालयामध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले.

१९५० मध्ये सत्यकथा मासिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या रानमाणूस या पहिल्या कथेपासून त्यांनी लेखन कारकिर्दीला सुरुवात झाली होती. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह हेडमास्तरची भूमिकाही गाजवली होती.

मुख्यमंत्र्यांची श्रध्दांजली

मराठी साहित्यात ग्रामीण विनोदाच्या रंग-ढंगातून रंगतदार आणणारे आणि लेखन, कथाकथनातून अस्सल गावरान, मराठमोळा बाज सातासमुद्रापार नेणारे साहित्यिक म्हणून द. मा. मिरासदार यांची ‘मिरासदारी’ अबाधित राहील. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वाने निखळ आणि अलौकिक प्रतिभावान असा साहित्यिक गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.

‘द. मा. म्हणजेच दादासाहेबांनी मराठी साहित्यात आपल्या नावाप्रमाणेच मिरासदारी निर्माण केली. मराठीत ग्रामीण जीवनातील पार, कट्ट्यावरचा आणि अशा अनेक इरसाल नमुन्यांचा विनोदी खजिन्याचा पेटाराच दादासाहेबांनी उघडला. विनोदी लेखन, कथाकथन यातून त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला मनमुराद हसवले. कथाकथनातून त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राचा मराठमोळा बाज सातासमुद्रापार नेला. तसेच ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातही गेले. दादासाहेब उभे राहायचे, खर्जातील आवाजात कथा रंगवून सांगू लागले की त्या गावातले नमुने आरसा दाखवल्याप्रमाणे खळखळून हसू लागायचे. विलक्षण निरिक्षण शक्ती आणि लेखन-सादरीकरणातील निर्भेळपणा यामुळे मिरासदार यांनी आपली अशी ‘मिरासदारी’ निर्माण केली. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्याने अलौकिक प्रतिभावान असा साहित्यिक गमावला आहे. ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

शरद पवार यांची श्रद्धांजली

द.मा. मिरासदार यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शोक व्यक्त केला असून आपली श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले आहे कि, बिराजदार यांच्या निधनाच्या वृत्तामुळे अतिशय दुःख झाले. मराठीतील एक अतिशय नामवंत लेखक, मराठीचे प्राध्यापक, कथाकथनकार म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख होती. शंकर खंडू पाटील, व्यंकटेश माडगूळकर आणि मिरासदार सर यांचे कथा कथनकाचे कार्यक्रम अनेक वेळा पाहण्याचा योग आला त्यातील मजा ही काही औरच होती. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली मी बरीच पुस्तके वाचली भोकरवाडीच्या गोष्टी, फुकट, बेंडबाजा, मिरासदारी, भुताचा जन्म, माझ्या बापाची पेंड, अशा अनेक पुस्तकांचा समावेश करावा लागेल.गेली अनेक वर्ष ते सार्वजनिक जीवनात दिसले नाहीत. प्राध्यापक मिरासदार सरांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!