Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांनाही सीबीआयचे समन्स , वाद वाढण्याची चिन्हे

Spread the love

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील मनी लॉन्डरिंग प्रकरणाच्या अनुषंगाने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांनाही सीबीआयने समन्स बजावले असले तरी सीताराम कुंटे यांनी सीबीआयसमोर त्यांच्या कार्यालयात जाण्यास नकार दिला आहे. दरम्यान सीबीआयला आपला जबाब पाहिजे असेल तर त्यांनी आपल्या कार्यालयात यावे असे कुंटे यांनी सीबीआयला कळविले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या खंडणीच्या आरोपांची सध्या सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. अनिल देशमुख गेल्या तीन महिन्यांपासून फरार आहेत. सीबीआयसोबतच अंमलबजावणी संचालनालयाकडूनही या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप केला. देशमुखांनी निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलावून दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करायला सांगितले , असा आरोपही पत्रात करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सध्या सीबीआय करत आहे.याच तपासाचा भाग म्हणून साक्ष नोंदवण्यासाठी सीताराम कुंटे आणि संजय पांडे यांना सीबीआयकडून समन्स बजावण्यात आले आहेत.

दरम्यान या प्रकरणाची चौकशी करत असताना सीबीआयने अनेक अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. चौकशीचाच एक भाग म्हणून सीबीआय सीताराम कुंटे आणि संजय पांडे यांचा जबाब नोंदवणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, संजय पांडे आणि सीताराम कुंटे यांनी सीबीआय कार्यालयात जाण्यास नकार दिला आहे. तसेच दोन्ही अधिकाऱ्यांनी यापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सीबीआयसोबत चर्चा देखील केली होती. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांनी सीबीआयला विनंती केली आहे की, जबाब नोंदवायचा असल्यास आपल्या कार्यालयात यावे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!