Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : ममता बॅनर्जी यांचे भवितव्य होते आहे आज ईव्हीएममध्ये कैद, कडेकोट बंदोबस्तात मतदान

Spread the love

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भवानीपूरसहीत विधानसभेच्या तीन जागांसाठी मोठ्या सुरक्षेसह आज सकाळी ७.०० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. यापैकी भवानीपूर विधानसभा मतदारसंघात मतदानानंतर ममता बॅनर्जी यांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद होईल. भाजपच्या प्रियांका टिबरेवाल आणि माकपचे श्रीजीव विश्वास हे त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भवानीपूरशिवाय मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगीपूर आणि समसेरजंग या विधानसभा मतदारसंघातही मतदान सुरु आहे.

भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून केंद्रीय सुरक्षा दलाच्या १५ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. ज्या तीन मतदारसंघात मतदान चालू आहे तिथे सीआरपीसीच्या कलम १४४ अंतर्गत मतदान केंद्रांच्या २०० मीटरच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कुठल्याही मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसराच्या आत पाचहून अधिक नागरिकांना एकत्र येण्यास मनाई आहे. शस्त्रे, स्फोटकं, दगडं आणि फटाके आणण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे कोलकाता पोलिसांनी आदेशात म्हटलं आहे.

सर्वत्र कडेकोट बंदोबस्त

भवानीपूरमधील ९७ मतदान केंद्रांवरील प्रत्येक २८७मतदान केंद्रांवर केंद्रीय दलाचे जवान तैनात करण्यात आलेत. त्यानंतर मतदान केंद्रांच्या बाहेरची सुरक्षा ही कोलकाता पोलिसांच्या हातात असेल, अशी माहितीही अधिकाऱ्यानं दिली आहे. भवानीपूरमध्ये ३८ ठिकाणी पोलीस चौक्या उभारण्यात आल्या असून मतदानाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. भवानीपूर पोटनिवडणुकीसाठी एक अतिरिक्त पोलीस आयुक्त, चार सहआयुक्त, १४ उपायुक्त आणि अनेक सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली असल्याचीही माहिती अधिकाऱ्यानं दिली आहे.

आम्ही तीन अतिरिक्त नियंत्रण कक्ष देखील उघडले आहेत. ईव्हीएमची वाहतूक करण्यासाठी १४१ विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे ही त्यांनी सांगितले .अधिकाऱ्याने पुढे म्हटले की, शहरात अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे सर्व पोलिसांना रेनकोट घालण्यास आणि छत्री सोबत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान पावसाची शक्यता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने पाटबंधारे विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून सर्व मतदान केंद्रांवर पावसाचे पाणी साचल्यास ते तात्काळ काढण्यासाठी पंप तयार ठेवण्यास सांगितलं आहे. अधिकाऱ्यानं सांगितले की, पावसामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी पाटबंधारे विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एका निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले की, जंगीपूर आणि शमशेरगंजमध्येही कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या जागांवर गुरुवारी विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. ३ ऑक्टोबर रोजी मतमोजणी केली जाईल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!