Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraRainUpdate : मराठवाड्यात पावसाचा हाहाकर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Spread the love

मुंबई  : हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानुसार आजपासूनच राज्यात तुफान पावसाळा काल मध्य रात्रीपासूनच सुरुवात झाली असून मराठवाड्यातील औरंगाबादसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे.  बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाची तीव्रता आता कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रात झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील ७ जिल्ह्यांना रेड अलर्ट  तर १० जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी  करण्यात आला आला आहे.

आज आणि उद्या केवळ महाराष्ट्रासाठी अलर्ट जाहीर कऱण्यात आलेला नाही  तर मध्यप्रदेश आणि गुजरातमधील काही भागांतही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव,  या ७ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून मुंबई, सिंधुदुर्ग, नंदुरबार, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली या १० जिल्ह्यांना या १० जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

गुलाब चक्रीवादळामुळे २८ सप्टेंबर२०२१ ते १ऑक्टोबर २०२१ या कालावधीत कोकण किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये तसेच या कालावधीत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या कालावधीत कोकण किनारपट्टीच्या भागात ४०-४५ आणि ४५- ६० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच समुद्र किनारपट्टीच्या भागातील गावांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महापालिका इमारतींसमोरील झाड असे उन्मळून पडले

औरंगाबाद जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा ईशारा…

औरंगाबाद : मुंबई येथील कुलाबा हवामानशास्त्र केंद्राने दिलेला मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता  तरी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय कक्षाने केले आहे. या अंदाजानुसार  दि .२९ सप्टेंबर पर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे तसेच नदीकाठच्या परिसरातील गावाच्या लोकांनी सतर्क राहावे, नदी पात्रात कोणीही उतरु नये, वाहने, पशुधन इत्यादी सुरक्षित स्थळी ठेवण्यात यावे. सर्व प्रवण क्षेत्रातील गावांना सावधानतेचा इशारा देण्याबाबत सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. असेही जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

मराठवाड्यात पावसाचा हाहाकार

औरंगाबाद :   मराठवाड्यात काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून उस्मानाबाद जिल्ह्यातील मांजरा नदीकाठच्या गावात तीन कुटुंब अडकून पडले आहेत. दरम्यान उस्मानाबादमधील मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळं धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे मांजरा धरणाचे पाणी मांजरा नदीत सोडण्यात आले आहे. या धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले असून मोठा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. वाकडी (शि) परिसरात पाणी शिरले आणि काही वेळात परिसर पाण्याखाली गेला. शेतात राहणारे प्रसाद सोमासे, उद्धव शिंदे, रामराव शिंदे यांच्या घराला प्रचंड पाण्याने वेढा घातला असून तीन कुटुंबातील १७ जण व जनावरे अडकली. हे लोक भीतीने मध्यरात्री घराच्या स्लॅबवर जाऊन थांबले. ही माहिती कळताच तहसीलदार विद्या शिंदे, शिराढोण चे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेटके व महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा विळखा वाढलेला असल्यामुळे त्यांना काढण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात एनडीआरएफची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प या सततच्या पावसामुळे पूर्ण भरले असून निम्न तेरणा धरण आणि सिना कोळेगाव धरण पूर्ण भरले मुळे पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे मांजरा धरण यापूर्वीच भरला असून मांजरा धरणातूनही पाण्याचा विसर्ग होत असताना नदीकाठच्या बॅक एरिया खाली येणाऱ्या गावांमध्ये नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. तर, कळंब तालुक्यातील वाकडी, लासरा येथेही पुराचे पाणी शिरले आहे. वाकडी कळंब येथे छतावर १७ लोक अडकले आहेत. तर ग्रामस्थांनी पशुधन सोडून दिले आहे. बीड जिल्ह्यातही रात्रीपासून मुसळधार पाऊस आहे. मुसळधार पावसाने बीड परळी बीड अंबाजोगाई रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने रस्ता काही काळासाठी बंद ठेवण्यात आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात हिरकणी बस वाहून गेली…

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड गावापासून २ किमी अंतरावर असणाऱ्या गावातील  बस वाहून गेल्याची दुर्घटना घडली आहे. उपलब्ध माहितीनुसार उमरखेड ते पुसद मार्गावर दहागाव नाल्यावर नागपुर आगाराची नांदेड वरून नागपूरकडे जाणारी हिरकणी बस क्र. ५०१८ वाहून गेली. आज सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार आनंद देऊळगावककर व उमरखेडचे पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली  बचावकार्य सुरू आहे. दरम्यान एसटी बस नाल्यात वाहून गेल्यानंतर एसटीतील दोन प्रवासी झाडावर चढलेले आहेत व दोन लोक एसटी बसच्या टपावर आहेत. या बसचा वाहकही   झाडावर असून त्याने सोबत ५ ते ६ प्रवासी असल्याचे ओरडून सांगितले. त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!