Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या विविध घोषणा , औरंगाबाद दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या या राजकीय विधानाची होते आहे चर्चा …!!

Spread the love

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर असून मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधत मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. दरम्यान भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका राजकीय विधानामुळे नवी राजकीय चर्चा सुरु झाली आहे. या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातही  उपस्थित होते.

मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या विविध घोषणा

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. ज्यामध्ये औरंगाबाद येथे संतपीठ स्थापन करण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने औरंगाबादमध्ये संतपीठ सुरु करण्यात येईल तसेच निजामकालीन दीडशे शाळांचा  पुनर्विकास , परभणीमध्ये शासकीय महाविद्यालय , औरंगाबाद आणि शिर्डी विमानसेवा सुरू करण्याची संकल्पना,  औरंगाबादमधील मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ३१७.२२ कोटी रुपये, उस्मानाबाद शहरासाठी१६८.६१ कोटी रकमेतून भूमीगत गटार योजना, शिर्डी विमानतळ औरंगाबादशी जोडणार, रस्त्यांचे डांबरीकरण,  हिंगोलीला हळद प्रक्रिया प्रकल्प , हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक , सफारी पार्क लवकर पूर्ण करणार, २०० मेगावॅट प्रकल्प सुरू करणार अशा विविध घोषणांचा समावेश आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना  अहमदनगर आणि औरंगाबादला रेल्वेने जोडण्याचे आवाहन केले.

आता कोविडवर वार करायची वेळ…

दरम्यान  स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आवाहन करताना म्हटले कि ,  मराठवाडा निजामशाहीतून मुक्त केला आता कोविडवर वार करायची वेळ आली आहे. पिढ्या किती बदलल्या, किती पुढे सरकल्या तरी मराठवाड्याच्या रक्तामध्ये जे एक शौर्य आहे, जिद्द आहे ते कोणी आलं तरी पुसू शकत नाही. पण आपल्यासाठी कोणी काय काय केलं त्याची एक जाण म्हणून एक स्मृतीदालन इथं निर्माण केलं. त्यावेळचा जो काही काळ होता. निजामाची एक मस्ती होती, आपला देश स्वातंत्र्य झाल्यानंतरही आम्ही संघ राज्यात सहभागी होणार नाही अशी भूमिका होती त्यांची. लाल किल्ल्यावर आपलं निशाण फडकवायचं अशी मस्ती होती. गेल्यावर्षी कोविडमुळे येऊ शकलो नाही. मी तुम्हाला सर्वांना सांगत असतो विनाकारण इकडे तिकडे फिरु नका. चेहऱ्यावर मास्क लावा. एका गोष्टीचं मला समाधान आहे, हा माझा मराठवाडा ज्या जिद्दीने तेव्हा निजमाशी लढला तसाच कोविडसोबत सुद्धा लोढतोय. ही सुद्धा लढाई साधी नाहीये, ही सुद्धा जीवघेणी लढाई आहे. या लढाईत शिस्त आणि संयम आवश्यक आहे. ही लढाई संयमाने जिंकायची आहे.

या कार्यक्रमास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार सय्यद इम्तियाज जलील, खासदार अनिल देसाई, सर्वश्री आमदार अंबादास दानवे, हरिभाऊ बागडे, अतुल सावे, संजय शिरसाट, प्रशांत बंब, मनिषा कायंदे, प्रदीप जैस्वाल, उदयसिंह राजपूत, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, विशेष पोलिस महान‍िरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक तथा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील आदींसह प्रतिष्ठीत नागरिक, स्वातंत्र्य सैनिक आदींची उपस्थिती होती.

नेमकं काय बोलले मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरूवात करताना ‘व्यासपीठावर बसलेल्या माझ्या आजी-माजी आणि भविष्यात एकत्र आले तर माझे भावी सहकारी’ अशा शब्दात सुरुवात केली. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राज्याच्या राजकारणात काही बदल होऊ घातला आहे कि काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांच्या आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना मला माजी मुख्यमंत्री म्हणू नका असे आपल्या भाषणात बोलल्याने राजकीय क्षेत्रातील लोकांचा भुवया उंचावल्या होत्या त्यातच मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले आहे. केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे हे मंचावर असताना त्यांच्याकडे पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे हे वक्तव्य केले आहे.

दरम्यान जाहीर व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या विधानाने आता शिवसेना-भाजपची पुन्हा युती होणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले हे सूचक वक्तव्य आहे का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जिल्हा परिषदेच्या इमारतीचे भूमिपूजन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीचेही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवेदेखील कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी रावसाहेब दानवेंनी तुफान फटकेबाजी केली. त्यामुळं उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर रावसाहेब दानवे यांनी मंचावर तुफान फटकेबाजी केली. मुख्यमंत्र्यांसमोरच दानवेंनी शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांना टोला लगावला आहे. ‘सोलापूरपासून- धुळ्यापर्यंत रेल्वे झाली नाही तर रावसाहेब दानवे यांना मतदान करु नका, असे अब्दुल सत्तार म्हणाले होते. मग मी पण म्हणालो सिल्लोड जिल्हा झाला नाही तर अब्दुल सत्तार यांना मतदान करु नका,’ असा मिश्किल टोला लगावला आहे.

एवढा लहान सभापती असतो का?

‘मी जिल्हा परिषदेचा सदस्य असताना नांगराच्या चिन्हावर निवडून आलो होतो. मला तेव्हा ६५ रुपयांचा भत्त्याचा चेक मिळाला. मला मॅनेजर चेक देईना. त्यांनी मला ओळखलेच नाही. कारण मी सभापती असेन असे त्यांना वाटत नव्हते. एवढा लहान सभापती असतो का?, असे बँक अधिकारी म्हणाले. शेवटी माझी ओळख करुन द्यावी लागली,’ असा किस्सा रावसाहेब दानवेंनी सांगितला.

देवेंद्र फडणवीस यांची तत्काळ प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ,  माजी सहकाऱ्यांना भावी सहकारी म्हणत केलेल्या वक्तव्यावर  विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी म्हटले आहे कि ,  त्यांच्या शुभेच्छा… चांगली गोष्ट आहे. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते . मात्र, भाजपची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही सत्तेकडे डोळे लावून बसलेलो नाहीत. आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका करत आहोत. त्यांचे हे जे काही अनैसर्गिक गठबंधन बनले  आहे ते फारकाळ चालू शकत नाही. मला असं वाटतं कदाचित मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आले  असेल की अशा प्रकारचे  अनैसर्गिक गठबंधन करुन महाराष्ट्राचे  नुकसान होत आहे आणि म्हणून त्यांनी मनातली भावना बोलून दाखवली असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले . दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या विधानावर चंद्रकांत पाटील म्हणाले, मी काय मनकवडा नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय सांगू शकणार नाही.


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!