Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : मला माजी मंत्री म्हणू नका … चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने खळबळ , संभाजी ब्रिगेडच्या युतीवरही केले हे भाष्य !!

Spread the love

पुणे : एका कार्यक्रमात बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माझा उल्लेख माजी मंत्री म्हणून करु नका असे म्हटले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने राज्यात पुन्हा भाजपा सरकार येणार की दुसरा काही मोठा राजकीय भूकंप होणार यावर खल होत आहे.

पुण्यातील देहूगाव येथे एका खासगी दुकानाचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होते. उद्घाटन करण्याच्या अगोदर सूत्र संचालन करणाऱ्या व्यक्तीने माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन होत असल्याचे सांगितले तेंव्हा उद्घाटनासाठी उठतानाच त्यांनी हे सूचक वक्तव्य करत माजी मंत्री म्हणून नका दोन-तीन दिवसात कळेल असे म्हणून शाब्दिक धक्का दिला आहे.

दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या पुरुषोत्तम खेडेकर यांनी ” मराठा मार्ग ” मध्ये लिहिलेल्या “भाजपशी युती हाच पर्याय…” लेखावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे कि , पुरुषोत्तम खेडेकर यांच्याकडून अशाप्रकारचा प्रस्ताव आलेला नाही. त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर आमची कोअर कमिटी निर्णय घेईल. असा काही प्रस्ताव असेल तर तो राज्याच्या प्रदेशाध्यक्षांकडेच यायला हवा. आमचा पक्ष हा जगभर पसरलेला आहे. देशात १२ राज्यात आमचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे इतक्या सहजपणे हे निर्णय होत नाहीत. त्याची मोठी प्रक्रिया असते, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

पुरुषोत्तम खेडेकर यांनी लेखात नक्की काय म्हटले आहे ?

मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडकडून संयुक्तरित्या प्रकाशित होणाऱ्या “मराठा मार्ग” या मासिकात पुरुषोत्तम खेडेकर यांनी आगामी काळात राजकीय वाटचाल करताना भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याची भूमिका मांडली आहे. मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पुरुषोत्तम खेडेकर यांनी ‘मराठा मार्ग’ या मासिकामध्ये संपादकीय लेख लिहिला आहे.

अर्थात भारतीय जनता पक्ष हा अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्त्वातील पक्ष आहे. विशेष म्हणजे मराठा सेवा संघाची संपूर्ण मांडणी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेच्या पूर्णपणे विरोधात आहे. मात्र तरीही पुरुषोत्तम खेडेकर यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा विचार मांडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

या लेखात त्यांनी म्हटले आहे कि , “महाआघाडीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीनही पक्षांची इच्छा असली तरी ते संभाजी ब्रिगेडला वाटा देण्यास नकार देण्याची शक्यता अधिक आहे. त्यांची प्रवृत्ती संभाजी ब्रिगेडला दूर ठेवून केवळ त्यांच्या नावाचा आणि कामाचा एकतर्फी लाभ घेणं आहे. तसेच ते संभाजी ब्रिगेडला गृहीत धरून आहेत. भाजपा सत्तेत आली तरी हरकत नाही, पण संभाजी ब्रिगेडला सत्तेपासून दूर ठेवलं पाहिजे ही या तीनही पक्षांची मानसिकता आहे. या परिस्थितीत संभाजी ब्रिगेडला सत्ता हस्तगत करायची आहे. संभाजी ब्रिगडेला खूप मर्यादा आहे. स्वबळ अवघड आहे. शेवटी भाजपा युती हाच पर्याय उरतो. मराठा सेवा संघ आणि आरएसएस यांची तत्त्व पूर्णपणे परस्परविरोधी आहेत. ती तशीच राहतील. पण राजकारणात अंतिम यश हेच एकमेव तत्त्व असते. ”

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!