Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : बसपाकडून ब्राहमण मतदारांना गवसणी , सन्मान, सुरक्षा आणि विकास मायावतींचा नारा

Spread the love

लखनौ : उत्तर प्रदेशातील ब्राह्मण मते मिळविण्यासाठी सर्वच पक्षांची स्पर्धा लागली असून बसपानेही ब्राह्मण संमेलनाचे आयोजन केले होते. या संमेलनात बोलताना बसपा नेत्या मायावती यांनी भाजपपेक्षा बसपची सत्ता असताना ब्राह्मणांची परिस्थिती जास्त चांगली होती त्यामुळे अधिकाधिक ब्राह्मणांनी बसपमध्ये यावे, त्यांनी मते दिली तर त्यांना संरक्षणही दिले जाईल, असे आवाहन केले.

उत्तर प्रदेशात २००७ मध्ये ब्राह्मण व दलित असे सामाजिक-राजकीय समीकरण मांडून मायावतींनी सत्ता मिळवली होती, हेच गणित मायावती पुन्हा मांडत आहेत. लखनौमध्ये मंगळवारी झालेल्या प्रबुद्ध संमेलनात मायावतींनी ब्राह्मण मतदारांना भाजपऐवजी बसपाला प्राधान्य देण्याची विनंती केली. २००७ मध्ये बसपने ८६ ब्राह्मण उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते आणि ४१ विजयी झाले होते. यावेळी मायावतींनी ब्राह्मण मतदारांसाठी सन्मान, सुरक्षा आणि विकास हा नारा दिला आहे.

अन्य जातींचीही संमेलने

गेल्या २३ जुलै रोजी अयोध्येपासून बसपच्या ब्राह्मण संमेलनांना सुरुवात झाली होती व उत्तर प्रदेशातील सर्व ७४ जिल्ह्यांमध्ये ही संमेलने घेण्यात आली. मायावतींचे अत्यंत विश्वासू सहकारी व खासदार सतीश मिश्रा यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. यापुढेही अशी संमेलने घेतली जातील, त्यात अन्य जातींच्या संमेलनांचाही समावेश असेल, अशी माहिती बसपा नेते पांडे यांनी दिली.

मायावतींच्या सभेत, ‘हाथी नही गणेश है, ब्रह्मा, विष्णू, महेश है’, हा २००७ मध्ये दिला गेलेला नारा पुन्हा दिला गेला. बसपचे सरकार आले तर कोणत्याही जातींबाबत भेदभाव केला जाणार नाही, विशेषत: उच्च जातींबाबत ही काळजी घेतली जाईल. भाजपच्या सरकारमध्ये ब्राह्मण, दलित आणि गरिबांचे शोषण झाल्याचा आरोप मायावतींनी केला. दरम्यान यावेळेला पुतळे आणि पार्क उभे न करता राज्याच्या विकासाकडे अधिक लक्ष दिले जाईल अशी ग्वाही मायावती यांनी दिली. हिंदू व मुस्लीम यांचा ‘डीएनए’ एक आहे, तर संघ मुस्लिमांना सावत्रपणाची वागणूक का देत आहे, असा सवालही मायावतींनी प्रबुद्ध संमेलनात केला.

सर्वांचेच ब्राह्मण मतदारांवर लक्ष

उत्तर प्रदेशात ११ टक्के ब्राह्मण मतदार असून पुढील सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या समाजाला आपलेसे करण्याचा प्रयत्न बसपच नव्हे तर समाजवादी पक्षाच्या वतीनेही केला जात आहे. सपनेही जुलैमध्ये ब्राह्मण संमेलने आयोजित केली होती. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर सत्तेत व पक्षात डावलले जात असल्याची भावना ब्राह्मण मतदारांमध्ये असल्याने या निर्णायक मतांना आपल्याकडे खेचण्याची चढाओढ बसप व सप यांच्यात लागली आहे. भाजपनेही ब्राह्मणांची मते टिकवण्यासाठी जिल्हावार सभा आयोजित केल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!