Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : आगामी रणनीती ठरविण्यासाठी नागपुरात संघप्रणीत ३६ संघटनांच्या बैठकीला प्रारंभ

Advertisements
Advertisements
Spread the love

नागपूर : मोदी सरकार समोरील आव्हाने आणि देशातील संवेदनशील प्रश्नांवर नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीत चर्चा सुरु असल्याचे वृत्त आहे. कालपासून नागपुरात या बैठकीची सुरुवात झाली आहे. इंधन दरवाढीमुळे मध्यमवर्गीयांवर वाढलेला आर्थिक भार, कृषी कायद्याला असलेला शेतकऱ्यांचा विरोध, त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात निर्माण होत असलेली नाराजी आणि पाच प्रमुख राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका हे या चर्चेचे विषय असल्याचे सांगण्यात येत असून संघाशी संबंधित देशात ३६ संघटनांची हि बैठक होत आहे.

Advertisements

शनिवारी संघाशी संबंधित इतर संस्थांचा आढावा घेतला जाणार असून त्यानंतर रविवारी व सोमवारी संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन त्यात समन्वय बैठकीत झालेल्या विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. रेशीमबाग चौकातील संघाच्या स्मृती मंदिर परिसरात आयोजित या दोनदिवसीय बैठकीचे उद्घाटन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. या वेळी सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, सरसहकार्यवाह अरुणकुमार, माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

दरवर्षी संघाशी संबंधित संघटनांची अशी बैठक होते. त्यात या संघटनांच्या कामाचा आढावा व भविष्यातील कामाची दिशा ठरवली जाते. बैठकीच्या पहिल्या दिवशी संघाची राजकीय शाखा भारतीय जनता पक्ष तसेच विश्व हिंदू परिषद या संघटनांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे संघटन सचिव बी. एल. संतोष, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटनमंत्री विनायक देशपांडे बैठकीत उपस्थित होते.

लोकांच्या नाराजीवर विशेष चर्चा

प्रारंभी भारतीय जनता पक्षातर्फे बी.एल. संतोष यांनी गेल्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा मांडताना आगामी निवडणूक काळात संघसंबंधित अन्य संघटनांच्या सहकार्यासंबंधी भूमिका मांडली. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने राम मंदिराच्या निर्माणकार्याची माहिती दिली. संघाच्याच भारतीय किसान संघानेही शेतकरी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकांना तोंड देताना कोणती व्यूहरचना आखायची तसेच लोकांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणती पावले उचलायची याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या बैठकीत उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारच्या कामगिरीवर संघ समाधानी असून आगामी निवडणुकीत त्यांना मनापासून पाठिंबा देण्याचा निर्णय संघ घेऊ शकतो, दरम्यान अफगाणिस्तानमधील अलीकडील घडामोडींवरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता बळकावणे सुसंस्कृत राष्ट्रांसाठी योग्य नाही. भारतात काश्मीरमधील दहशतवाद्यांचे मनोबल यामुळे वाढू शकते. या संदर्भात बैठकीत ठराव होण्याची शक्यता संघाचे अभ्यासक दिलीप देवधर यांनी वर्तवली. पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीमध्ये चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा किसान संघाच्या आढावा बैठकीत उपस्थित होऊ शकतो, याकडे देवधर यांनी लक्ष वेधले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!