Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ThaneNewsUpdate : “त्या ” बहादूर महिला अधिकाऱ्याशी मुख्यमंत्र्यांची बातचीत

Spread the love

ठाणे : माथेफिरू फेरीलवाल्याच्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर दुखापत झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारी कल्पिता पिंपळे यांची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून विचारपूस केली. तुमच्या बहादुरीचे वर्णन करण्यास आपल्याकडे शब्द नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाल्याने काही वेळ कल्पिता पिंपळे देखील गहिवरल्या. आपण लवकर बऱ्या व्हा व इतर कोणत्याच गोष्टीची आपण काळजी करू नका असे मुख्यमंत्री म्हणाले.

“त्या”  माथेफिरुला कडक शासन व्हावे ही इच्छा कल्पिता यांनी बोलून दाखवताच त्याची काळजी तुम्ही करू नका अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले. महापौर नरेश म्हस्के यांच्या मोबाईलवरून हा फोन लावण्यात आला होता. यावेळी आयुक्त डॉ विपीन शर्मा यांची सानुग्रह निधी उपलब्ध करून देण्याची मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी त्वरित मान्य केली.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांची रुग्णालयात भेट घेऊन कल्पिता पिंपळे यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे मनपाच्या अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने सोमवारी सायंकाळी हल्ला केला. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांच्या हाताची बोटे छाटली गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर हल्लेखोर फेरीवाल्याला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!