Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraRainUpdate : पुढील चार दिवस कुठे कमी , कुठे मध्यम तर कुठे संततधार

Spread the love

पुणे : राज्यात पुढील २४ तासांमध्ये काही ठिकाणी मध्यम , काही ठिकाणी अगदी जोरदार ते मुसळधार पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान ऑगस्ट महिन्यात राज्याच्या बहुतांश भागात पावसाने दीर्घ उघडीप दिल्यामुळे राज्यातील एकूण १६ जिल्ह्यांसह मुंबई आणि पुणे शहरांतही हंगामातील पाऊस सरासरीच्या तुलनेत मागे पडला आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भाच्या पश्चिमेकडील काही भागावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मुंबई व उपनगरांमध्ये पुढील २४ तास संततधार पाऊस सुरु राहणार आहे. तर काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस (१५ सेंटीमीटरपेक्षा कमी) पडण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात आले आहे.

 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस अनेक भागांत पाऊस हजेरी लावणार असल्याने काही ठिकाणी तरी हंगामातील पावसाची सरासरी पूर्ण होण्याची आशा आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदूरबार, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, विदर्भातील अकोला, अमरावती आदी जिल्ह्यांत काही भागांत या दोन दिवसांत मुसळधारांची शक्यता आहे.

पाण्याच्या साठ्यात वाढ नाही

दरम्यान या वर्षी १६ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने पाणीसाठ्याबाबत अद्यापही चिंता कायम असून, आठवड्यापासून पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. राज्यातील सर्व धरणांत मिळून गतवर्षीच्या तुलनेत १६ टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पुढील दोन दिवस मोठ्या पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. मात्र, मुंबई आणि पुणे शहरातील पाऊसही ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मागे पडला आहे. या सर्वांचा परिणाम राज्यातील पाणीसाठ्यावर झाला आहे. गतवर्षी याच वेळी राज्यातील सर्व धरणांत मिळून ७६.७४ टक्के पाणीसाठा होता. तो सध्या ६०.५८ टक्क्यांवर आहे.

मुंबई शहरातील पाऊस सरासरीच्या तुलनेत ८ टक्क्यांनी कमी आहे. पुणे शहरात ऑगस्टअखेर ४३५ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना तो चारशे मिलिमीटरचा टप्पाही पूर्ण करू शकलेला नाही. पुणे जिल्ह्यात १ टक्क्यांनी पाऊस कमी आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, जळगाव, धुळे, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, मराठवाड्यातील हिंगोली, कोकण विभागातील पालघर आदी जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!