Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : यंदा दही हंडी , गणेशोत्सव नाहीच , राज्य सरकारबरोबर केंद्राच्याही राज्याला सूचना

Spread the love

मुंबई : महाराष्ट्र सरकारबरोबर केंद्र सरकारनेही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी स्थानिक स्वरूपाचे निर्बंध लावण्यात यावेत अशा स्पष्ट सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मुख्य सचिवांना एका पत्राद्वारे दिल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्रात संसर्ग कमी होत असला तरी काही जिल्ह्यांत पॉझिटीव्हिटी दर आणि कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्राने ही सूचना केली आहे.

याबाबत राज्य शासनाने यापूर्वीच यासंदर्भात सूचना दिल्या होत्या, आणि आता केंद्रीय आरोग्य विभागाने देखील या उत्सवांमध्ये काळजी घेण्याची गरज असल्याचा सांगून त्याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पत्राच्या अनुषंगाने केले आहे. कोविडचा धोका अजून गेलेला नसल्याने हे उत्सव सुपर स्प्रेडर्स ठरू शकतात अशी भीती आयसीएमआर आणि एनसीडीसीने यापूर्वी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रासह इतरही काही राज्यात विषाणूच्या नव्या प्रकाराचा संसर्ग वाढतोय असे लक्षात आले आहे, त्यामुळे ही काळजी घेणे गरजेचे आहे असे केंद्रीय आरोग्य विभागाच्या या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राने आणि देशानेही संसर्ग रोखण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे टेस्ट –ट्रेक-ट्रीट वर भर देणे तसेच कोविड संदर्भातील सर्व आरोग्याचे नियम याचे पालन कटाक्षाने होईल हे पाहणे गरजेचं आहे, असेही या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, राज्य शासनाने यापूर्वीच यासंदर्भात सूचना दिल्या होत्या, आणि आता केंद्रीय आरोग्य विभागाने देखील या उत्सवांमध्ये काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगून त्याला दुजोरा दिला आहे. आज आपण जनतेच्या जीवाला जास्त महत्व देणे गरजेचे आहे हे यातून अधोरेखित होते आहे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांनी आरोग्याच्या नियमांचे कसोशीने पालन करणे गरजेचे आहे तसंच राज्य शासन वेळोवेळी यासंदर्भात ज्या सूचना देईल ते जनतेच्या हिताचेच असल्याने राजकीय, सामाजिक, आणि सर्व थरांतील लोकांनी कृपया सहकार्य करावे, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी परत एकदा केले आहे.

एकीकडे मुख्यमंत्र्यांनी आधीच दहीहंडी उत्सव घेण्यास मनाई केली आहे. तर दुसरीकडे भाजपचे आमदार राम कदम यांनी काहीही झालं तरी दहीहंडी उत्सव घेणारच अशी घोषणा केली आहे. त्यांच्यापाठोपाठ मनसेनं सुद्धा दहीहंडी उत्सव घेण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्रानेही आता दहीहंडी आणि गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी स्थानिक स्वरूपाचे निर्बंध लावण्याच्या सूचना केल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!