Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : मुलांमध्ये वाढतोय कोरोना पण घाबरू नका, मुलांची विशेष काळजी घ्या : राजेश टोपे

Spread the love

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असली तरी आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची धास्ती वाटू लागली आहे. राज्य सरकारच्या वतीने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने सर्व तयारी केली असल्याची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे राज्यात अवघ्या २५ दिवसांत ४,५०० पेक्षा अधिक मुले कोरोनाबाधित झाल्याचे आढळून आले आहे. मात्र लहान मुलांच्या कोरोना संसर्गाची टक्केवारी ८ टक्के आहे आणि मृत्यूचं प्रमाण अत्यल्प आहे, त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यात आज एका दिवसात १६३ कोरोना पॉझिटिव्ह मुलांची नोंद झाली आहे. तर मागील २५ दिवसांत १०वर्षांखालील साडेचार हजाराहून अधिक मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये मुंबईतील कोविड बाधित मुलांचं प्रमाण एकूण बाधितांच्या ९ टक्के इतकं आहे. मुंबईत एका वसतीगृहात एकाच दिवशी १५ मुले कोरोनाबाधित झाल्याचे आढळून आले आहे. याबाबत मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत गेल्या १५ दिवसांत ३६५ मुले कोरोनाबाधित झाली आहेत. यामध्ये ० ते ५ वयोगटातील ५८, ६ ते १० वयोगटातील ७६, ११ ते १५ वयोगटातील १२८ आणि १६ ते १८ वयोगटातील १०३ मुलांचा समावेश आहे. मुंबईतील पालिका रुग्णालयात सध्या ३० मुलांवर उपचार चालू आहेत.

दरम्यान तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रात कोविडवर मात करण्यासाठी सरकारने तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे मुंबईसह अनेक शहरात लहान मुलांचे कोविड बालरोग विभाग तयार केले जात आहेत. टास्क फोर्सचे सदस्य डॉ. समीर दलवाई यांनी सांगितलं की, “मुंबईत १४६० ऑक्सिजनयुक्त बेड, २२७ आयसीयू, ३३ एनआयसीयूची तयारी महापालिकेने केली आहे. किती बेड वापरात आणले जावे हे लहान मुलांच्या बाधित होण्याच्या प्रमाणावर अवलंबून आहे.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!