Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

KolhapurNewsUpdate : पुरग्रस्तांच्या मदतीवरून ठाकरे- फडणवीस यांच्यात कलगीतुरा

Spread the love

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच वेळी कोल्हापूरमध्ये हजर होते. त्यांनी समोरासमोर एकमेकांची भेट देखील घेतली. अशा प्रकारे दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक असल्याची गरज दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली असली, तरी या परिस्थितीत तातडीने पॅकेज जाहीर व्हावे की अभ्यासाअंती मदत जाहीर व्हावी, यावर मात्र दोन्ही नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगताना दिसू लागला आहे.


एकीकडे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत “मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नसून मदत जाहीर करणारा मुख्यमंत्री आहे”, असा टोला फडणवीसांना लगावला असताना, फडणवीसांनी देखील त्यावर पलटवार केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरचा पाहणी दौरा केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांकडून केल्या जाणाऱ्या पॅकेजच्या घोषणेच्या मागणीविषयी विचारणा केली असता “मी पॅकेज जाहीर करणारा नसून मदत करणारा मुख्यमंत्री आहे”, अशी खोचक प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यानंतर लगेचच झालेल्या देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी याबाबत विचारणा केली असता फडणवीसांनी देखील लागलीच पलटवार केला. “आमची हरकत नाही. त्यांनी त्याला पॅकेज म्हणावं की मदत म्हणावं हा त्यांचा मुद्दा आहे. फक्त तुम्ही त्याची घोषणा करावी. सामान्य माणसाला मदत मिळण्याशी मतलब आहे”, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

“नुकसान झाल्यानंतर तातडीची मदत राज्य सरकारकडून यायला हवी होती. ती अद्याप आलेली नाही. नागरिक सातत्याने २०१९च्या मदतीचा उल्लेख करत होते. तेव्हा रोखीनं तात्काळ मदत करण्यात आली होती. एखादी आपत्ती आल्यानंतर त्यानंतरचा महत्त्वाचा काळ असतो, ज्यात तातडीची कामं करावी लागतात. घरांमध्ये, दुकानांमध्ये चिखल घुसतो, सर्व वस्तू ओल्या झाल्या असतात. अंतर्वस्त्रापासून सर्व गोष्टी लोकांना आणाव्या लागतात. अशा परिस्थितीत ही तातडीची मदत आवश्यक असते. त्या कुटुंबाकडे तेवढेही पैसे नसतात. सरकारने अद्याप ती मदत दिलेली नाहीत. उशीर झाला आहे. पण आता तरी सरकारने ती मदत करावी, अशी आमची अपेक्षा आहे”, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!