Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraRainUpdate : १३६ बळी : होत्याचे नव्हते करून गेलेल्या पावसाच्या पुरानंतर आला आता अश्रूंचा महापूर !!

Spread the love

रायगड : यावर्षीच्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानीमुळे  सर्व काही होत्याचे नव्हते झाले आहे. दुर्घटनेच्या मालिकेत रायगड जिल्ह्यातील तळीये गावात झालेल्या ३८  जणांना आपला जीव गमवावा लागला असून ५२ लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.  मुख्यमंत्र्यांनी या गावाला भेट देऊन ग्रामस्थांना धीर दिला असला तरी दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांच्या आक्रोशाने अक्षरशः काळीज भेदून गेले. दरम्यान पावसाने आलेला पूर ओसरू लागला असला तरी लोकांच्या डोळ्यातील अश्रूंच्या महापुराच्या थोपवणे काळालाच शक्य होणार आहे. 

दरम्यान राज्यात पावसामुळे होणारी परिस्थिती आणि दरडी कोसळल्यामुळे सुमारे १२९  जणांचा मृत्यू झाला. पुढचे दोन-तीन दिवस कोकणात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय भारतीय हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. १ जूनपासून राज्यात पावसाचे १३६ बळी गेल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. यंदा दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

सैनिक अमोल कोंडाळकर यांच्यावरही कोसळला दुःखाचा डोंगर

तळिये येथील भीषण दुर्घटनेत देशासाठी सैन्यात गेलेले अमोल कोंडाळकर यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. कोंडाळकर यांचे  संपूर्ण कुटुंबच काळाच्या पडद्याआड गेले आहे. यामध्ये  त्यांच्या कुटुंबातील आई-वडील, बहीण आणि बायको असे चार जण दगावले आहेत.  अमोल कोंडाळकर हे वरीष्ठ पदाच्या ट्रेनिंगसाठी पुण्यात आहे. त्यामुळे दुर्दैवी दुर्घटनेतून ते बचावले. दुर्दैवाची बाब म्हणजे, गेल्यावर्षीच अमोल कोंडाळकर यांचं लग्न झालं होतं. लग्न करून नव्या आयुष्याची सुरुवात करणारे जवान अमोल कोंडाळकर आज एकटे पडले आहे.

आर्मीच्या जवानाची वर्दी घालून ते देशाची सेवा करत आहेत, पण स्थानिक प्रशासनातील वर्दी घातलेल्या माणसांनी आमच्या कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी प्रामाणिकपणे केली असती तर आज ही वेळ आली नसती अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

…यांचेही सर्वस्व गेले

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनाग्रस्तं तळीये गावाला भेट देऊन पहाणी केली. यावेळी त्यांनी आपलं कुटुंब गमावलेल्या गावकर्यांशी संवाद साधून त्यांचं सांत्वनही केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबातील ६ जणांना गमावलेल्या विजय केशव पांडे यांचं सांत्वन केलं. विजय केशव पांडे यांचे आई-वडील, बहीण, बायको, ६ महिन्यांचा मुलगा आणि १० वर्षाची मुलगी असे कुटुंबातील ६ जणं दगावली आहे. दरम्यान सह्याद्री पर्वत रांगांमध्ये धोकादायक परिस्थितीत राहणाऱ्या गावकऱ्यांचंही योग्य पुर्नवसन करण्याची योजना असल्याचं पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं.

जितेंद्र आव्हाड यांची अशीही तत्परता !!

रायगड जिल्ह्यातील महाडजवळ असलेल्या तळीये या गावातील दुर्घटनेत होत्याचं नव्हतं झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: या गावाला भेट देऊन दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांचे केले. शिवाय एकीकडे अद्याप बेपत्ता लोकांचे शोधकार्य चालू आहे तर दुसरीकडे, तळीये गाव उभारण्याची जबाबदारी म्हाडाने घेतली असल्याची घोषणा नगरविकास मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्यासोबतच तळीये गावातील नवे घर कसे असणार याचा आराखडा सुद्धा आव्हाड यांनी सादर केला आहे. ‘कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसवण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जो शब्द दिला की कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती’ असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हवामान खात्याचा इशारा

भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) आधीच पावसाने तडाखा बसलेल्या सहा जिल्ह्यांसाठी पुन्हा रेड अलर्ट जारी केला आहे आणि खबरदारीच्या उपाययोजनांची शिफारस केली आहे. सागर किनारी भागातील कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत पुढील २४ तास रेड अलर्टचा इशारा दिला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!