Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Tokyo Olympics 2020 : टोकियो ऑलिम्पिकचे प्रेक्षकाविना थाटात उद्घाटन , मेरी कोम आणि मनप्रीत करताहेत भारतीय पथकाचे नेतृत्व

Spread the love

टोकियो : जपानची राजधानी टोकियो येथे आजपासून ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली आहे. करोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षासाठी तहकूब करण्यात आल्या होत्या पण एका वर्षानंतर या स्पर्धा खेळल्या जात आहेत. आज या स्पर्धेचा उद्धाटन सोहळा थाटात संपन्न झाला. या सोहळ्याच्या मार्च पास्टमध्ये भारतीय तुकडी २१ व्या क्रमांकावर उतरली. यात २२ खेळाडू आणि ६ अधिकारी सहभागी झाले होते. या मार्चपास्टमध्ये ग्रीकचा पहिला क्रमांक होता.


भारताच्या वतीने सहा वेळा विश्वविजेती बॉक्सर एम.सी. मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकाचे नेतृत्व केले. भारतीय पथकाच्या प्रवेशावेळी पंतप्रधान मोदींनी टाळ्या वाजवून संघाला प्रोत्साहन दिले. १२७ खेळाडूंसह २२८ सदस्यीय पथक टोकियो ऑलिम्पिकमध्ये पाठवण्यात आले आहे.

या सोहळ्याचे वैशिष्ट्य हे आहे कि , ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच प्रेक्षकांविना हा सोहळा पार पडला असला तरी त्याचा थाट काही कमी जाणवला नाही. कोरोना व्हायरसमुळे ऑलिम्पिक स्पर्धा प्रेक्षकांविनाच पार पडणार आहे. त्यात काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे स्पर्धेवरही अनिश्चिततेची टांगती तलवार होती. सर्व संकटांवर मात करून आज अखेर ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाल्याची घोषणा करण्यात आली. पण, पाकिस्तानच्या खेळाडूंनी संचलनात कोरोना नियम मोडल्याचे समोर आले आणि आता सोशल मीडियावरून त्यांच्यावर टीका होत आहे.

कोरोनामुळे ऑलिम्पिकमध्ये झाले मोठे बदल

कोरोनामुळे ऑलिम्पिकमध्ये बरेच मोठे बदल पाहायला मिळतील. खेळाडूंना या विषाणूच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी एक अतिशय कठोर बायो बबल तयार केला गेला आहे. टोकियो ऑलिम्पिक प्रेक्षकांशिवाय रंगणार आहे. कोरोनाच्या महामारीमुळे खेळाडूंना दररोज १९ चाचण्यांमधून जावे लागणार आहे. या चाचणीच्या अहवालाशिवाय कोणत्याही खेळाडूला मैदानावर प्रवेश मिळणार नाही. इतकेच नव्हे, तर एखाद्या खेळाडूने अंतिम फेरी गाठली असेल आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असेल तर त्याला पदकाच्या शर्यतीतून माघार घ्यावी लागणार आहे.

दरम्यान पाकिस्तानी संघाचे ध्वजधारक खेळाडू उद्धाटन सोहळ्यात मास्क न घातलेले दिसले. सर्व देशांचे ध्वजधारक व अन्य खेळाडू मास्क घालून संचलनात सहभागी झाले होते. पण, पाकिस्तानची बॅडमिंटनपटू महूर शहजाद हिचा मास्क हनुवटीवर होता आणि नेमबाज खलिल अख्तर यांचा मास्क फक्त तोंडावर होता. किर्गिझस्तान आणि तजाकिस्तान संघातील खेळाडूंच्या चेहऱ्यावरही  मास्क दिसला नाही.

तिरंदाजीतून भारत मोहीम सुरू करणार

भारतातातर्फे टोकियो ऑलिम्पिकमध्ये १२५ खेळाडू भाग घेत आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताचे तिरंदाजी आणि बॉक्सिंग खेळाडू मैदानात उतरतील. भारताची स्टार आर्चर दीपिका कुमारी ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी नशीब आजमावत आहे. दीपिका कुमारीकडून भारताला सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. याशिवाय तरुणदीप राय, अतनू दास आणि प्रवीण जाधव हेदेखील तिरंदाजीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तीन भारतीय बॉक्सर लव्हलिना, विकास कृष्णन आणि सतीश कुमार स्वतंत्र स्पर्धांमध्ये भाग घेतील.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!