Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraRainUpdate : अस्मानी संकटात ५० जणांचा बळी , पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात स्थिती गंभीर

Spread the love

मुंबई : राज्यात पावसाने  रौद्ररूप धारण केले असून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील कोल्हापूर, सातारासह तळकोकणात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. तर, अनेक ठिकाणी लोक पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यामुळे विविध दुर्घटनामंध्ये आत्तापर्यंत राज्यात ४५ ते ५० जणांचा मृत्यू झाला असल्याची  माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.


दरम्यान राज्यातील अस्मानी संकटाची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोननंतर महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात निर्माण झालेली  पूर परिस्थिती लक्षात घेऊन  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आहे.

याबद्दल अमित शहा यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि , ‘महाराष्ट्राच्या रायगडमध्ये पाऊस आणि भूस्खलनामुळे घडलेली घटना अत्यंत दु:खद आहे. यासंबंधी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एनडीआरएफ प्रमुखांशी चर्चा केली. एनडीआरएफच्या टीम्स मदत आणि बचाव कार्यात सक्रीय आहेत. केंद्र सरकार लोकांचा जीव वाचविण्यासाठी हरएक संभाव्य मदत पोहचवत आहे’.

महाराष्ट्रात  आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू

गेल्या दोन दिवसांपासून पावसानं राज्यातील बहुतांश भागात धुमाकुळ घातला आहे. तळकोकणात बुधवारी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळं चिपळूण, खेड, महाडमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूण, खेडमध्ये पुरानं थैमान घातलं आहे. छोटे पूल, अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक गावांचा संपर्क तुटला. शेतजमीन व भातपिकांचे अतोनात नुकसान झाले. अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. तर, ठिकाणी दरडी कोसळून अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान राज्यात दरडी कोसळून ५० जणांचा मृत्यू झाल्यानं चिंता वाढली आहे. घरांवर दरडी कोसळून कुटुंबच्या कुटुंब मातीखाली दबली गेली आहेत. नागरिकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफचं पथक घटनास्थळी तातडीने दाखल झालं आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात तळई येथे दरड कोसळून ३२ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर, ४० जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे.

साताऱ्यात दरड कोसळून १२ ठार

साताऱ्यातील पाटण तालुक्यातील आंबेघर गावातही  दरड कोसळून तब्बल १२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात सात ते आठ घरे  ढिगाऱ्याखाली गाडली गेली. तर, १५ ते २० घरांचं नुकसान झाले  आहे. तर खेड तालुक्यात शुक्रवारी सकाळी धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यात पोसरे बौद्धवाडी येथे तब्बल १७ जण दरडीखाली असल्याची भीती आहे तर बीरमणी येथे दोन जण अडकले आहेत या ठिकाणी एनडीआरफची टीम पाठवण्यात आली आहे. एनडीआरफची आणखी एक टीम बोलावण्यात आली आहे. मदतकार्य युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली आहे. बीरमणी येथेच अलीकडे दोन कि.मी.चा रस्ता खचला आहे अशी माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्र्यांचे आवाहन

दरम्यान, कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात उपस्थित झाले होते. बचाव आणि मदत कार्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे  मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. नागरिकांनी धोक्याच्या ठिकाणाहून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

अजित पवार यांची संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. अजित पवार यांनी राजनाथ सिंह यांना राज्यातील सद्यस्थितीची माहिती दिली आहे. संकटग्रस्त भागांत सैन्यदलाची अधिकची मदत उपलब्ध करून देण्याचं आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी दिले  आहे.

अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाशी समन्वय ठेवण्यासाठी राज्य सरकारनं मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यावर नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी सोपवली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे स्वत: बचाव व मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत.

पोलादपूर तालुक्यात ११ जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुक्यातील गोवेले ग्रामपंचायत हद्दीमधील सुतारवाडी येथे गुरुवारी (२२ जुलै) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. यावेळी कोसळलेल्या दरडीखाली सुमारे आठ ते दहा घरांचे नुकसान झाले असून आणखी काही घरे दरडीसोबत उतारावर वाहून गेली आहेत. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!