Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraRainUpdate : मुसळधार पावसाने राज्यात घेतले १२९ बळी : बाळासाहेब थोरात

Spread the love

मुंबई : राज्याच्या  कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा हाहा:कार सुरु असून  या पावसाने  तब्बल १२९ नागरिकांचा बळी घेतल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. दरम्यान राज्यातील काही भागात दरड कोसळल्यामुळे मृतांची संख्या वाढल्याचे  थोरात म्हणाले. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात मिळून एकूण ५ ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.


महाड तालुक्यातील तळीये गावात भीषण दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. तळीयेतील मृतांसह राज्यभरातील मृतांचा आकडा ४४ वर पोहोचला आहे. तळीयेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. राज्यभरात पावसाचा जोर आहे. अनेक ठिकाणी लोक पुरात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या १२९ वर पोहोचली आहे, अशी माहिती थोरात यांनी दिली आहे.

तळीये गावात ३८ जणांचा मृत्यू

महाड तालुक्यातील तळीये मधलीवाडी या गावातील जवळपास ३५ घरांवर दरड कोसळून अनेक कुटुंब गाडली गेली आहे. काल दुपारी साडे चारच्या सुमारास ही या गावात दरड कोसळली. मात्र, संपूर्ण महाड शहर आणि सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी साचले  होते. त्यामुळे मदतकार्यासाठी यंत्रणा पोहोचवणेही अवघड झाले. अखेर आज दुपारी १ च्या सुमारास एनडीआरएफची टीम तळीये गावात पोहोचली. त्यावेळी नागरिकांनी ३० पेक्षा अधिक मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले होते. तर आतापर्यंत ३८ मृतदेह ढिगाऱ्याखालून काढल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

पोलादपूर तालुक्यात ११ जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील केवनाळे आणि गोवेले सुतारवाडी गावातही भूस्खलन झालं आहे. महाडच्या तळीये गावाप्रमाणेच पोलादपूर तालुक्यातील या दोन्ही गावात डोंगराचा काही भाग कोसळला. त्यात काही घरे गाडली गेली. त्यामुळे या दोन्ही गावातील ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दरड कोसळल्यामुळे १७ जण ठार झाल्याची भीती

चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडीतही दरड कोसळल्यामुळे १७ जण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर खेडमधल्या धामणंदमध्ये १७ घरांवर दरड कोसळली आहे. यात काही कुटुंब अडकले असण्याची शक्यता आहे. खेड तालुक्यातील बिरमई येथेही  दरड कोसळलून २ जण दगावले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी ही माहिती दिली आहे. खेडमधील धामणंदच्या दुर्घटनेनंतर लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!