Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Political Update : मुंडे भगिनींच्या समर्थनार्थ भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनाम्याचे सत्र , पंकजा मुंडे दिल्लीत

Spread the love

मुंबई : प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आपण नाराज नसल्याचा खुलासा पंकजा मुंडे यांनी केला असला तरी समर्थक नाराज असल्याची भूमिका त्यांनी मांडली होती. यावेळी त्यांनी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा होणंही योग्य असल्याचे  म्हटले  होते. दरम्यान राज्यात समर्थकांचं राजीनामासत्र सुरु असतानाच पंकजा मुंडे दिल्लीत दाखल झाल्या आहेत. यावेळी त्या भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत. दिल्लीत भाजपाच्या राष्ट्रीय सचिवांची एक बैठक पार पडणार आहेत. या बैठकीत पंकजा मुंडे सहभागी होणार आहेत. यावेळी पंकजा मुंडे भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत.

शनिवारी भाजपाच्या बीड जिल्ह्यातील ११ तालुकाध्यक्षांसह २० पदाधिकाऱ्यांनी शनिवारी राजीनामे दिले. बीड जिल्ह्यातील राजीनाम्याचं लोण अहमदनगर जिल्ह्यामध्येही पोहोचलं असून, मुंडे भगिनींच्या समर्थक असलेल्या पाथर्डी पंचायत समितीच्या भाजपाच्या सभापती सुनीता दौंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनीसुद्धा आपल्या राजीनामा दिला आहे. या दोघांनीही भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे राजीनामे सोपवले आहेत.

दरम्यान बीड जिल्हा परिषद सदस्या सविता बडे, पंचायत समिती सदस्य प्रकाश खेडकर आणि भाजपा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संग्राम बांगर, भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. लक्ष्मण जाधव, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय सानप, समाज माध्यमप्रमुख अमोल वडतीले, तालुकाध्यक्ष महादेव खेडकर, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे यांच्यासह २५ पदाधिकार्‍यांनी शनिवारी पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सोपवले. यामध्ये परळीसह एकूण ११ तालुकाध्यक्षांचा समावेश आहे.

मंगळवारी कार्यकर्त्यांची बैठक

दरम्यान मंगळवारी पंकजा मुंडे यांनी मुंबईत या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. वरळीतील कार्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी पंकजा मुंडे समर्थकांशी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. खरंतर, आतापर्यंत भाजपच्या ४९ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे ही भाजपसाठी मोठी चिंतेची बाब आहे.

‘केंद्रीय मंत्रिमंडळात दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना संधी देण्यात आली पण महाराष्ट्रात भाजपचा विस्तार करण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीचं काय चुकलं होतं,’ असा सवाल करत प्रीतम मुंडे यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर पक्षाविरोधातील नाराजी बोलून दाखवली जात आहे. त्यातच आता थेट पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!