Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Modi Cabinet Expansion : ठरलं म्हणतात !! उद्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, उच्चशिक्षित तरुण नेतृत्वाला संधी

Spread the love

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या म्हणजे बुधवारी संध्याकाळी ६ वाजता पार पडणार आहे. मंत्रिमंडळाच्या या विस्तारात तरुणांचा प्राधान्यक्रमाने  विचार करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे . त्यामुळे भारताच्या इतिहासात या मंत्रिमंडळात सर्वाधिक तरुण असतील असे वृत्त आहे.  विशेष म्हणजे आतापर्यंत त्यांच्या मंत्रिमंडळात जेमतेम शिकलेले लोक होते अशी सातत्याने टीका करण्यात येत असल्यामुळे आता मोदींनी आपल्या नवीन सदस्यांच्या अधिकतम शैक्षणिक पात्रतेला प्राधान्य दिले असल्याचेही सांगण्यात येत आहे. यात पीएचडी, एमबीए, पदव्युत्तर उमेदवारांचा समावेश असेल.


या वृत्तानुसार मोदींनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना , प्रत्येक राज्यावर आणि अगदी  प्रदेशावर म्हणजे बुंदेलखंड, पूर्वांचल, मराठवाडा, कोकण  येथील प्रतिनिधींना प्रतिनिधित्व दिले जाणार आहे. मंत्रिमंडळात लहान समुदायांना देखील प्रतिनिधित्व दिले जात आहे. यावेळी यादव, कुर्मी, जाट, पासी, कोरी, लोधी इत्यादी समाजाचे प्रतिनिधित्व दिसेल. या विस्तारानंतर साधारणतः दोन डझन ओबीसी किंवा मागासवर्गीय मंत्री यावेळी मंत्रिमंडळात दिसतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.  त्यात अधिक महिला मंत्री असतील आणि प्रशासकीय अनुभव असणाऱ्यांना विशेष प्रतिनिधित्व दिले जात आहे.

सहकार मंत्रालयाची निर्मिती

दरम्यान देशात पहिल्यांदाच सहकार मंत्रालयाची निर्मिती करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. ‘सहकार से समृद्धी’ या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी धोरणाला बळकटी देण्यासाठी सहकार क्षेत्रासाठी वेगळे  मंत्रालय असावे  या उद्देशातून हे नवे  मंत्रालय सुरू करण्यात येत आहे.  या मंत्रालयासाठी मंत्रिपदाची नियुक्ती देखील उद्याच्याच मंत्रिमंडळ विस्तारात केली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे देशाचे पहिले  केंद्रीय सहकार मंत्री म्हणून कोणाची वर्णी लागणार हे सुद्धा उद्या कळणार आहे.

रामविलास पासवान यांच्या भावाला संधी ?

माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांच्या विरोधात बिहारमध्ये लोक जनशक्ती पक्षाच्या (एलजेपी) सत्ता उलटवणाऱ्या पशुपती पारस हेसुद्धा दिल्लीत आहेत. त्यांच्या जवळच्या सूत्रांचे म्हणणे आहे की त्यांना गृहमंत्री अमित शहा यांचा फोन आला आणि काल संध्याकाळी तातडीने दिल्लीसाठी निघाले असल्याचे वृत्त आहे. याशिवाय तृणमूल आणि काँग्रेसकडून भाजपकडे जाणारे दिनेश त्रिवेदी आणि जितिन प्रसाद यांना सुद्धा संधी मिळण्याची शक्यता आहे . दरम्यान अनुप्रिया पटेल (अपना दल), पंकज चौधरी, रीता बहुगुणा जोशी, रामशंकर कठेरिया, लल्लन सिंग आणि राहुल कसवान आदी नेत्यांनीही फिल्डिंग लावली असून आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे, पशुपती पारस, नारायण राणे आणि वरुण गांधी यांचीही नावे चर्चेत आहेत.

रिक्त झालेली मंत्रीपदे आणि अतिरिक्त जबाबदारी

राज्य घटनेतील तरतुदींप्रमाणे केंद्रीय  मंत्रिमंडळात ८१ मंत्र्यांचा समावेश करता येऊ शकतो. सध्या मोदींच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ ५३ जणांचे आहे. त्यामुळे विस्तार करताना  आणखी २८ नेत्यांची  वर्णी लावता येऊ शकते, पण किती मंत्रिमंडळ विस्तारात किती जणांचा समावेश करण्यात  आला आहे हे उद्याच समजणार आहे.  शिवसेना आणि अकाली दल एनडीएमधून बाहेर निघाले तसेच रामविलास पासवान व इतर काही मंत्र्यांच्या निधनानंतर सर्व मिळून अनेक मंत्रिपदे रिक्त आहेत. दरम्यान संभाव्य फेरबदलात अनेक मंत्र्यांची नावं कमी केली जाऊ शकतात, तर काहींचा मंत्रिपदाचा भार कमी केला जाऊ शकतो. यामध्ये नरेंद्र सिंह तोमर, रवीशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल आणि प्रह्लाद जोशी यांच्याकडील अतिरिक्त मंत्रालयाची जबाबदारी कमी केली जाऊ शकते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!