Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : मोठी बातमी : राफेल व्यवहार प्रकरणी फ्रान्स मध्ये आजी माजी अध्यक्षांची चौकशी

Spread the love

नवी दिल्ली : भारताने फ्रान्सशी केलेल्या राफेल विमानांच्या खरेदी प्रकरणी चौकशी करावी या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जंग जंग पछाडले पण  भारतात मोदी सरकारकडून या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या.  मात्र  आता या राफेलबाबत याच विषयावरून फ्रान्समध्ये  या करारातल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एका  न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यात आली असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान १४  जूनला  फ्रान्समध्ये या राफेल व्यवहाराच्या चौकशीबाबत नव्या हालचाली  घडल्याने काँग्रेस पुन्हा या मुद्यावर सक्रिय होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी काँग्रेसनेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांनी २०१९  च्या लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा चांगलाच गाजवला परंतु नंतर हा मुद्दा बाजूला गेला. परंतु फ्रान्समध्ये मात्र आता राफेलची फाईल पुन्हा ओपन झाली असून या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी फ्रान्समध्ये एका न्यायमूर्तींची नियुक्ती झाली आहे . मीडियापार्ट या न्यूज वेबसाईटने  यासंदर्भातली वृत्त प्रसिद्ध केले आहे.  या वृत्तानुसार  फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष ओलांद आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन या दोघांचीही यात चौकशी होऊ शकते. कारण २०१६ साली जेव्हा हा करार झाला तेव्हा मॅक्रॉन हे फ्रान्सचे अर्थमंत्री होते.

काय आहे प्रकरण ?

२०१६ मध्ये राफेल विमानांच्या खरेदीसाठी फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशन आणि भारत सरकारमध्ये करार झाला होता.  या कार्यानुसार ३६ विमानं ५९ हजार कोटी रुपयांना खरेदी करण्याचा हा करारा होता.
काँग्रेसच्या काळात या कराराचा प्रस्ताव आला तेव्हा १२६ विमानांसाठीचा होता. पण मोदी सरकारनं केलेल्या करारात विमानांची संख्याही कमी केली पण किंमत मात्र जास्त ठेवली गेल्याचा आरोप आहे. यात थेट २१ हजार कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. दरम्यान दोन महिन्यांपूर्वीच फ्रान्सच्या मीडियापार्ट वेबसाईटने  या करारासाठी दसॉल्टने ८.५ कोटी रुपये गिफ्ट म्हणून दिल्याचा गौप्यस्फोट केला होता.

याच मुद्द्यावरुन २०१९ च्या निवडणुकीत राहुल गांधींनी ‘चौकीदार चोर है’ चा नारा दिला होता परंतु त्याचा काळात पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे प्रकरण घडले आणि जन्मात मोदींच्याच बाजूने गेले. दरम्यान भारताच्या सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणी चौकशीस नकार दिला. मात्र या मुद्द्यावरून  काँग्रेस न्यायालयात  गेली नव्हती,  या प्रकरणात न्यायालयाकडून न्याय  मिळणार नाही, तर संयुक्त संसदीय समिती नेमूनच या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी असे काँग्रेसचे म्हणणे होते आणि आहे.

राहुल गांधी यांचे ट्विट ” चोर कि दाढी…”

भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये ३६ राफेल फायटर जेटच्या झालेल्या व्यवहाराची आता फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी होणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टीका केली आहे. आपल्या ट्वीटर अकाउंटवरून राहुल गांधी यांनी “चोर की दाढी…” एवढे तीन शब्दच ट्वीट केले आहेत. याशिवाय, या ट्वीटमध्ये राहुल गांधींनी #RafaleScam असा हॅशटॅग देखील राहुल गांधींनी दिला आहे. त्यामुळे या ट्वीटच्या माध्यमातून राहुल गांधींनी अप्रत्यक्षपणे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच निशाणा साधल्यामुळे आता पुन्हा एकदा या मुद्द्यावरून भाजपा आणि काँग्रेस यांच्यामध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!