Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

JalnaNewsUpdate : चर्चेतली बातमी : पोलिसांचे निलंबन , केंद्रीय राज्यमंत्री दानवे -खोतकर , पत्रकार आणि वाळू माफिया गॅंग !!

Spread the love

जालना :  जालना जिल्ह्यातील एका पत्रकाराला वाळू माफियांनी केलेली मारहाणीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली होती. या प्रकरणातून  केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या तक्रारीवरून पाच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते.  मात्र हे निलंबन अन्यायकारक असल्याचे सांगत माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी थेट मुंबई गाठून हे निलंबन मागे घेण्यास जिल्हा पोलीस अधीक्षकांना भाग पाडले असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे पत्रकारावर झालेली मारहाण आणि आरोपी राहिले बाजूला त्यात हे दुसरेच राजकारण सुरु झाले असल्याचे चित्र आहे.


याबाबतची अधिक माहिती अशी कि , जाफराबाद येथील पत्रकार गणेश पाबळे यांच्यावर वाळू माफियांनी दिनांक ११ जून रोजी हल्ला केला होता. या हल्ल्यात पाबळे यांच्यासह तीन जण गंभीर जखमी झाले होते. हा हल्ला करणारे हल्लेखोर रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयात लपले असल्याच्या संशयावरून जाफराबाद पोलिसांनी दानवे यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन तेथे झडती घेतली होती. त्यानंतर रावसाहेब दानवे यांनी याबाबत थेट पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्याकडे तक्रार केली. पोलिसांनी नाहक आपल्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन तेथे झडती घेतली व कार्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांना धमकावले असल्याचे त्यांनी नमूद केले.

दानवे यांच्या तक्रारीची दखल घेत पोलीस अधीक्षक देशमुख यांनी पत्रकार गणेश पाबळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कारवाई  करण्याऐवजी या हल्ल्याचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोटरे, पोलीस कर्मचारी मंगलसिंग सोळंके, सचिन तिडके, शाबान जलाल तडवी यांना चौकशीविना दिनांक १२ जून रोजी तडकाफडकी निलंबित केले होते.  या पोलिसांचे निलंबन मागे घेण्यात यावे, अशी मागणी भीमशक्ती या सामाजिक संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष सुधाकर निकाळजे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक बोऱ्हाटे, माजी आमदार चंद्रकांत दानवे आदींनी केली होती.

दरम्यान या कारवाईवर  आक्षेप घेत पोलीस अधीक्षकांच्या या निर्णयावर टीका सुरु झाली. त्यावरून  केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्जुन खोतकर यांनी थेट गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांकडे  धाव घेऊन दानवेंच्या तक्रारीवरून केलेलं निलंबन कसे चुकीचे आहे आणि हे निलंबन मागे घेण्याची विनंती केली. त्यामुळे  अखेर रात्री उशीरा कार्यालयीन चौकशीनंतर पोलिसांवरील हे निलंबन मागे घेऊन त्यांना रुजू होण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले.  त्याचबरोबर दानवे आपल्या पदाचा दुरुपयोग करत असून  ते वाळू माफियांना संरक्षण देत असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे मुद्दा पत्रकाराला झालेल्या मारहाणीचा आणि मारहाण करणाऱ्या वाळू माफियांच्या टोळीचा असताना दानवे -खोतकर यांच्यात हा वाद रंगला असला तरी पत्रकाराला मारहाण करणाऱ्या आरोपींचा शोध घेता घेता निलंबित झालेल्या पोलिसांना खोतकरांमुळे न्याय मिळाला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!