Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पैशाच्या पावसाच्या नादात त्याने गमावले तब्बल ५२ लाख 

Spread the love

पुणे खरे तर विद्देचे माहेरघर समजले जाते. परंतु याच पुण्यात विद्येंला लाजवावा असा प्रकार घडला आहे . एकविसाव्या शतकातही पैशाचा पाऊस पडू शकतो यावर विश्वास ठेवत एका व्यावसायिकाने एका भामट्याच्या नादी लागून तब्बल ५२ लाख रुपये गमावल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने एका भामट्याने शहरातील एका मोठ्या व्यावसायिकाला गंडविले आहे. या प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास चालू आहे. पोलिसांनी पैशाचा पाऊस पडणाऱ्या भामट्याला अटक केली आहे.

या विषयीची अधिक माहिती अशी कि, धायरीच्या गणेशनगर परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय व्यावसायिकाला लुबाडणाऱ्या भामट्याचे नाव किसन पवार असून त्याने फिर्यादी व्यावसायिकाला सातत्याने पैशांचा पाऊस पाडण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी अनेक प्रकारचे अघोरी विधी करण्याचा दावा केला,. हे विधी केल्यानंतर लागलीच आकाशातून पैशांचा पाऊस पडेल, असा ठाम आरोपीने फिर्यादीला दिला होता. दरम्यान आपल्या अंधश्रद्धेपोटी व्यावसायिकाचा किसनवर विश्वास बसला आणि त्याने किसनला पैसे देण्यास सुरुवात केली.

५२ लाख गेल्यानंतर उघडले डोळे 

दरम्यान आरोपी किसन सातत्याने व्यावसायिकाकडे पैसे मागू लागला. प्रत्येक वेळी वेगवेगळे विधी करण्यासाठी हे पैसे लागत असल्याचे सांगितले. त्यामुळे पैशांचा पाऊस पडल्यानंतर हे सर्व पैसे वसूल होऊन आपण गर्भश्रीमंत होऊ, या अपेक्षेपोटी व्यावसायिकाने देखील मोकळा हात सोडून पैसे द्यायला सुरुवात केली. ही रक्कम तब्बल ५२ लाख १ हजार रुपयांच्या घरात गेली. तेंव्हा शेवटी व्यावसायिकाचा धीर सुटला. मात्र, तरी देखील किसन शेवटचा एक विधी राहिला आहे, असे सांगायला लागला. अखेर हा सगळा प्रकार हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच व्यावसायिकाने सिंहगड पोलीस धाव घेत आपली आपबिती सांगितली.

किसन म्हणायचा, माझ्याकडे दैवी शक्ती आहेत!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसन आपल्याकडे दैवी शक्ती असून त्याचाच वापर करून आपण पैशांचा पाऊस पाडू शकतो, असा दावा करत असे. पण शेवटी व्यावसायिकाने पैसे देणे बंद केले. दरम्यान पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांनी शोध सुरू कला आणि जालना पोलिसांच्या मदतीने किसनला अटक करण्यासाठी सापळा रचण्यात आला. किसनचा कारनामा पुरेपूर ओळखलेल्या पुणे क्राईम ब्रांच पोलिसांनी जालना पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. किसन जालन्यामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्याकडे एका व्यक्तीला अडचण असल्याचे सांगून पाठवण्यात आले. या व्यक्तीकरवी किसनने व्यावसायिकाला देखील फसवल्याचे निश्चित झाल्यानंतर त्याला लागलीच अटक करण्यात आली.

पोलिसांचे आवाहन 

दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी सामान्यांना आवाहन केलं आहे. “आम्ही लोकांना आवाहन करतो की अशा प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या कुणावरही विश्वास ठेऊ नका. अजून कुणाला किसननं फसवलं असेल, तर त्यांनी आम्हाला संपर्क करावा”, अशी प्रतिक्रिया वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!