Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : गफलत वगैरे काहीही नाही , वडेट्टीवारांनी पुन्हा दिले ” असे” स्पष्टीकरण…

Spread the love

मुंबई : लॉकडाऊन कि, अनलॉक याची राज्यात गरमा गरम चर्चा चालू असताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आधी पत्रकार परिषद घेऊन ५ टप्प्यांनुसार राज्यात अनलॉक करण्याची घोषणा केली खरी पण  काही तासांतच राज्य सरकराने अनलॉकचा निर्णय झालेला नसून प्रस्ताव अजूनही विचाराधीन असल्याचे  स्पष्ट केले. दरम्यान या  गोंधळाला पुन्हा विजय वडेट्टीवार यांनी उत्तर दिले असून आपल्या बोलण्यात  ‘तत्वत: मान्यता’ असा शब्द राहून गेल्याचे सांगून आपली बाजू मांडली आहे.


याबाबत खुलासा करताना वडेट्टीवार म्हणाले कि , “गफलत वगैरे काहीही नाही. बैठकीमध्ये ५ टप्पे ठरवण्यात आलेले आहेत. त्याला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. लॉकडाउन लागू करणे  ही सरकारची जबाबदारी नाही. ज्या भागातील जनतेने  सहकार्य केले , त्या भागातला लॉकडाऊन या प्रक्रियेने कमी करायचा हे धोरण आपण ठरवले  आहे. डिझास्टर मॅनेजमेंटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना या निर्णयाला तत्वत: मान्यता मिळाली आहे. या एकूण पॉझिटिव्हिटी रेट किंवा ऑक्सिजन बेडच्या ऑक्युपन्सीच्या आधारावर हा निर्णय घेण्याचे  ठरले  आहे. याला तत्वत: मान्यता मिळाली आहे. यात टप्प्याटप्प्याने लॉकडाउन काढायचा याचा अंतिम आदेश मुख्यमंत्री काढणार आहेत.

अंतिम आदेश मुख्यमंत्री काढतील

दरम्यान गुरुवारी संध्याकाळी विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यात ५ टप्प्यांमध्ये अनलॉक करण्याचा निर्णय झाल्याचं जाहीर केलं. त्यावर उद्यापासून म्हणजेच शुक्रवार ४ जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे  देखील त्यांनी स्पष्ट केले . मात्र, यावेळी बोलताना कुठेही त्यांनी ‘निर्णयाला तत्वत: मान्यता’ मिळाल्याचा उल्लेख केला नव्हता. दरम्यान, त्यांच्या घोषणेनंतर राज्य सरकारने ‘असा कोणताही निर्णय झाला नसून प्रस्ताव विचाराधीन आहे’, असे  जाहीर करताच वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना घुमजाव करत “तत्वत: मान्यता” मिळाल्याचा उल्लेख केला. तसेच, अंतिम आदेश मुख्यमंत्री काढतील, असेही ते म्हणाले.

तत्वत: म्हणायचं राहिलं!

या गोंधळाचे स्पष्टीकरण देताना  वडेट्टीवार यांनी तत्वत: शब्द बोलायचा राहिला, असे  म्हटले  आहे. “तत्वत: शब्द राहून गेला. मला फ्लाईट पकडायची होती. तत्वत: मान्यता दिली ही माहिती द्यायची होती. पण त्यावेळी तत्वत: हा शब्द सांगायचा राहिला असेल. मुख्यमंत्री स्वत: या बैठकीला हजर होते. त्यानुसार टप्प्याटप्प्याने ही शिथिलता उद्यापासून देण्याचे  ठरले  आहे”, असे  ते म्हणाले. “आपत्ती व्यवस्थापन कमिटीचे मुख्यमंत्री हे अध्यक्ष आहेत. पण त्या कमिटीचा एक सदस्य म्हणून आणि खात्याचा मंत्री म्हणून मी ती माहिती सांगितली. मात्र, माध्यमांनी संपूर्ण राज्यात अनलॉक असे  वृत्त चालवले ”, असा दावा वडेट्टीवार यांनी यावेळी केला.

…तरीही निर्णय झाल्यावर वडेट्टीवार ठाम!

दरम्यान, निर्णयाला तत्वत: मान्यता मिळाल्याचं सांगतानाच असा निर्णय झाला असल्याच्या आपल्या भूमिकेवर वडेट्टीवार ठाम राहिले. त्यामुळे नेमका अंतिम निर्णय झाला की त्याला फक्त तत्वत: मान्यता मिळाली, याविषयीचा संभ्रम वाढला आहे. “अनलॉकचा विषय महाराष्ट्रासाठी नाही. आख्खा महाराष्ट्र उघडलेला नाही. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट, ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी कमी आहे, तिथे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला तत्वत: मान्यता मिळाली आहे. निकषांमध्ये जे जिल्हे येतील, त्यामध्ये टप्प्याटप्प्याने लॉकडाउन उघडण्याचा निर्णय झालेला आहे”, असेदेखील ते यावेळी म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!