Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रमजान ईद साजरी करा

Spread the love

औरंगाबाद :  जिल्ह्यातील सर्व जनतेने पाळलेली स्वयंशिस्त, लोकप्रतिनिधी यांचे मार्गदर्शन आणि प्रशासनाने केलेल्या उपाय योजना यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात नियंत्रणात आणण्यामध्ये आपल्याला यश प्राप्त झाले आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण म्हणजे रमजान ईद साजरी करण्याबाबत राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे नागरिकांनी पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम धर्मगुरूंच्या बैठकीस पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, महानगर पालिकेचे सहायक आयुक्त नंदकिशोर भोंबे, शहरातील मुस्लिम धर्मगुरू यांची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी सांगितले की, आतापर्यंत जनतेने कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाला पूर्णत: सहकार्य केले आहे. यापूर्वीही विविध सण उत्सव साध्या पध्दतीने साजरे करण्याच्या आवाहनाला जनतेने पूर्णपणे सहकार्य केले आहे. या वर्षीदेखील राज्य शासनाने रमजान ईद साजरी करण्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचे पालन मुस्लिम बांधव नक्कीच करतील याबाबत मला पूर्णपणे विश्वास आहे. नमाज पठण, भेटी-गाठी किंवा बाहेर एकत्र नमाज पठण यासाठी घराबाहेर न पडता कोरोना प्रतिबंधासाठी घरातच ईद साजरी करावी असे आवाहन आपल्यामार्फत मी मुस्लिम बांधवांना करीत आहे. मला विश्वास आहे की, आतापर्यंत जसे सहकार्य केले आहे तसे सहकार्य ईद साजरी करण्याबाबतही राहील.
पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता म्हणाले की, रमजानच्या पूर्ण महिन्यामध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी कोरोना प्रतिबंधासाठी नियम पाळून सहकार्य केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर राजकीय, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आहे. याबाबत आपले सहकार्य उत्तम राहिले आहे. कोरोना प्रतिबंधासाठी घरात राहून ईद साजरी करावी. पोलीस प्रशासन 24 तास कर्तव्य करित असून आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे असे आवाहन पोलीस आयुक्तांनी यावेळी केले.
माजी महापौर रशिद मामू यांनी ईद साजरी करण्याबाबत सर्व मुस्लिम बांधवांचे सहकार्य राहील. कोरोना महामारी लवकरात लवकर दूर व्हावी यासाठी अल्लाहकडे दुवा मागितली जाईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
अब्दुल रशिद मदनी यांनी ईद साजरा करण्याबाबतच्या राज्य शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करुन ईद साजरी केली जाईल याबाबत आश्वस्त करत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने क्षमतेपेक्षा जास्त काम केल्याने सर्व धर्मगुरूंच्या वतीने जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करतो असे यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हा प्रशासनामार्फत सर्व मुस्लिम धर्मगुरुंना राज्य शासनाने रमजान ईद साजरी करण्या संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची छायांकित प्रत माहितीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली.

ईद साजरी करण्याबाबत शासनाने दिलेल्या सूचना खालीलप्रमाणे नमुद करण्यात आलेल्या आहेत.

1. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईद करीता मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपआपल्या घरातच साजरे करुन ‘ब्रेक द चेन’ आदेशाचे काटेकोर पालन करणे उचित ठरेल.

2. नमाज पठणाकरीता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये.

3. रमजान ईद निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेने तसेच स्थानिक प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले असून त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे. त्या वेळेव्यतिरिक्त बाजारामध्ये सामान खरेदीकरिता गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.

4. कोविड-१९ या विषाणूच्या वाढत्या संसर्गास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने राज्यात फौ.दं.प्र.सं.कलम १४४ लागू असल्याने तसेच रात्रीची संचारबंदी असल्यामुळे संचारबंदीच्या कालावधीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये.

5. रमजान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.

6. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी.

7. रमजान ईदच्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

8. कोविड -१९ च्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष रमजान ईदच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!