Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : काबूलच्या शाळेजवळ भीषण स्फोट , ५० मृत्यू , १०० हून अधिक जखमी

Spread the love

काबुल : अफगाणिस्तानात शनिवारी काबुलमध्ये मोठा बॉम्बस्फोट घडला. एका शाळेजवळ हा स्फोट करण्यात आला असून आतापर्यंत 50 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून 100 हून अधिक जखमी झाले आहेत. या भयंकर कृत्याद्वारे लहान शाळकरी मुलांना लक्ष्य केले गेले आहे दरम्यान आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

हा स्फोट सय्यद-उल-शुहादा हायस्कूलजवळ घडल्याची माहिती मिळाली आहे. या शाळेत मुले आणि मुली दोघेही शिकतात मात्र त्यांची वेळ वेगवेगळी असते. ही शाळा तीन सत्रात भरवली जाते आणि विद्यार्थीनींना दुसऱ्या शिफ्टमध्ये शिकवले जाते. हा हल्ला नेमका याच वेळी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये बर्‍याच मुलींचा समावेश आहे. आज तकच्या वृत्तानुसार काही स्थानिक लोकांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, त्यांनी एका नव्हे तर, तीन स्फोटांचा आवाज ऐकला आहे. आत्तापर्यंत प्रशासनाने याची खातरजमा केलेली नाही. परंतु बरेच लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मोहम्मद अली जीना रुग्णालयामध्ये सर्वांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान या हल्ल्यानंतरपासून या परिसरात मोठा गोंधळ माजला आहे. येथील स्थानिकांचा रूग्णवाहिका चालक संस्थेपासून ते प्रशासनापर्यंत रोष पसरला आहे. काबुलच्या त्याच पश्चिम भागात गेल्या वर्षीही असे बॉम्बस्फोट झाले होते. त्यावेळी येथे एका रुग्णालयाला लक्ष्य केले गेले होते, जेथे गर्भवती महिलांसह अनेक नवजात बालकांचा मृत्यू झाला. आता लोक त्या घटनेतून सावरू लागले होते. तोपर्यंत शाळेजवळ दुसरा स्फोट झाला. अनेक लोक रुग्णालयाबाहेर दिसत आहेत, जे पीडितांना मदत करू इच्छित आहेत. कोणी रक्तदान करण्यास तयार आहेत. तर, कोणी आणखी काही मदत करू इच्छित आहेत. आपात्कालीन परिस्थितीत प्रत्येकजण एकवटलेला दिसत आहे. मात्र, घटनास्थळावरील स्थितीने आणि येथील छायाचित्रांनी सर्वांना हादरवले आहे. रक्ताने भिजलेली दप्तरे, पुस्तके जमिनीवर पडलेली आहेत. तर, एका इमारतीतून धुराचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत. एपीच्या एका पत्रकाराने सांगितले की, त्यांनी एकाच वेळी 20 मृतदेह रुग्णालयात पडलेले असल्याचे पाहिले आहेत. येथेच जखमींवर उपचारही सुरू आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, आता अफगाण सरकारनेही लोकांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

आतापर्यंत या भ्याड हल्ल्याची जबाबदारी कुणीही घेतलेली नाही. पण अनेक अंदाज बांधले जात आहेत. एकीकडे अफगाणिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेचे आयएसशी संधान बांधले गेले असून दोघांचे मिळून हे कारस्थान सुरू आहे, असा दावा तालिबान्यांनी केला आहे. तर, दुसरीकडे सरकारकडून याविषयी कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. तालिबानच्या प्रवक्त्याने या हल्ल्याचा निषेध केला आहे. परंतु, त्याचबरोबर आयएस आणि अफगाणिस्तानच्या इंटेलिजेंस एजन्सीवरही आरोप केले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!