Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#MaharashtraExams : अखेर दहावीच्या परीक्षाही रद्द

Spread the love

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याकडे पाहता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत लॉकडाऊन, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण आणि परीक्षांबाबतही चर्चा करण्यात आली. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता राज्यातील एसएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली. गुणांमध्ये समानीकरण यावे यासाठी इतर मंडळाप्रमाणे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर गुण देण्यात येणार आहेत. तसेच श्रेणी सुधार हव्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी केव्हा व कशी द्यायची यासंदर्भातही निर्णय लवकरच कळवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच बारावीच्या परीक्षांबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.
अन्य बोर्डांकडूनही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे निर्णय आत्तापर्यंत घेण्यात आले आहेत. यापूर्वी ICSE आणि CBSE ने देखील त्यांच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबतही प्रश्न विचारला जात होता. दरम्यान, मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!