Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : बाबासाहेबांची जयंती घरातूनच साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Spread the love

मुंबई  : राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार सन्मानाने साजरा केली जावी. गर्दी न करता, घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा उत्सव आणि आनंदाचा क्षण आहे. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान म्हणून या दिवशी शिस्तीचे पालन केले जाईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.


भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती कार्यक्रमाच्या नियोजनाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या व्यापक बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. बैठकीत जयंती समन्वय समितीच्यावतीने 14 एप्रिल या जयंतीदिनी कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमावलीचे पालन करून कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. चैत्यभूमी स्मारक तसेच मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असणाऱ्या ठिकाणी गर्दी न करता अभिवादन करा. राज्यभरातील अनुयायांनाही जयंती साजरी करण्याच्या शासन परिपत्रकातील नियमावलींचे पालन करून साधेपणाने जयंती साजरे करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, गेल्यावर्षी पूर्ण लॉकडाऊन होते. पण विषाणूने केवळ शिरकाव केला होता. आता मात्र निर्बंध कमी केले आहेत. कोरोनाने आक्राळविक्राळ रुप धारण केले आहे. दिवसागणिक रुग्णवाढ होऊ लागली आहे. जोपर्यंत आपण मनापासून शिस्त पाळत नाही, तोपर्यंत ही रुग्णवाढ कमी होणार नाही. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी घरातूनच अभिवादन करावे असे आवाहन करावे लागत आहे. कमीत कमी गर्दी आणि नियमांचे पालन करूनच जयंती साजरी करावी लागेल. साधारण परिस्थितीत आपण ज्या प्रथा-परंपरा पाळून जयंती साजरी करतो, त्या सर्व गोष्टी तितक्याच सन्मानपूर्व केल्या जातील. भीमसैनिक आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे सन्मान करणारे आपण सर्व डॉ. आंबेडकर यांच्या शिस्तीचे भोक्ते आहोत, हे अशा कठीण परिस्थितीत दाखवून देणे अपेक्षित आणि आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

अशा परिस्थितीतही डॉ. आंबेडकर यांचे इंदूमिल स्थित स्मारकाचे काम थांबू दिलेले नाही. तेथील पुतळ्यांची उंची आणि अनुषंगीक गोष्टींना गती दिल्याचे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, गर्दी न करता विविध समाजोपयोगी उपक्रमांनी जयंती साजरी करता येईल. रक्तदान शिबीरांचे आयोजन करता येईल. पण त्यासाठी आरोग्य विभाग आणि शासनाच्या सर्व यंत्रणांनी पुरेशी खबरदारी आणि पुर्व नियोजन करणे आवश्यक आहे, हे ध्यानात ठेवून या शिबीरांचे आयोजन करावे लागेल. त्याबाबतचे निर्देशही संबंधित यंत्रणांना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले.

जयंती समन्वय समितीने जयंती साधेपणाने साजरी करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल आणि स्वीकारलेल्या समंजस भूमिकेचेही मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. जंयतीदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मारकस्थळावरून थेट प्रक्षेपणाद्वारे दर्शन घेण्याची सुविधा तसेच बीआयटी चाळ आणि इंदूमिल या ठिकाणच्या कार्यक्रमांसाठी सुविधा याबाबतही सूचना करण्यात आल्या. त्याबाबत कार्यवाहीचे निर्देशही यावेळी संबंधित यंत्रणांना देण्यात आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!