Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : Good News : लसीकरणात राज्याचा देशात विक्रम !!

Spread the love

मुंबई : राज्यात शनिवारी एकाच दिवशी 4 लाख 62 हजार 735 नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदवला असून याबद्दल  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  राज्यातील आरोग्य यंत्रणेनेचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे. राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण वेगात चालू असून  काल 3 एप्रिल रोजी एकाच दिवसात 4 लाख 62 हजार नागरिकांना लसीकरण करण्यात आले. दरम्यान एकाच दिवसात एवढ्या उच्चांकी संख्येने लसीकरण करण्याची देशातील ही पहिलीच वेळ असून त्याचा विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविला गेला आहे.

लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांना मागे टाकत आतापर्यंत सुमारे 73 लाख 47 हजार 429 जणांचे लसीकरण करून देशात अग्रेसर  राहण्यात सातत्य राखले आहे. राज्यात 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी 3 लाखांहून अधिक जणांना लस देऊन राज्याने उच्चांक गाठला होता. तर  शनिवारी, 3 एप्रिलला राज्यभर 4102 लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंतची सर्वोच्च संख्या पार करीत 4 लाख 62 हजार जणांना लस देण्यात आली. पुणे जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक 76 हजार 594 जणांना लसीकरण करून राज्यात अग्रस्थान कायम राखले आहे. त्यापाठोपाठ मुंबई उपनगर (46 हजार 937), नागपूर (41 हजार 556), ठाणे (33 हजार 490) या जिल्ह्यांनी लसीकरणात आघाडी घेतली आहे,  अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून आरोग्य यंत्रणेच्या प्रभावी कामगिरीमुळे आणि नागरिकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे शनिवारी महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रमाची कामगिरी बजावली आहे. अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला सहा लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!