IndiaNewsUpdate : या लोकांना झालंय काय ? भारत माता कि जय म्हणून बलात्कार पीडितेची आरोपीबरोबरच काढली धिंड !!

भोपाळ : ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून जवळपास ४०० किमी दूर अंतरावर असलेल्या आदिवासी बहुल अलिराजपूर जिल्ह्यातील एका गावात गावकऱ्यांनी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीसोबतच दोरीने बांधून धिंड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे पीडितेच्या नातलगांनी, कुटुंबीयांनीच तिला आरोपीसोबत चालायला भाग पाडल्याचं समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून तरुणीला जमावाच्या तावडीतून सोडवत आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले.
सोशल मीडियावर या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. रविवारी हा प्रकार घडल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये पीडिता आणि आरोपीला एका दोरीने बांधून त्यांची धिंड काढताना दिसत आहे. त्यांच्या चहुबाजूला मोठा जमाव असून ते ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत आहेत. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी पीडितेची जमावापासून सूटका केली. या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस अधिकारी दिलीपसिंह बिल्वाल यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी बलात्कार करणाऱ्या आरोपीला आणि धिंड काढणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. पहिला गुन्हा बलात्काराचा आरोप असलेल्या २१ वर्षीय व्यक्तीविरोधात, तर दुसरा गुन्हा पीडितेच्या नातेवाईकांविरोधात आणि गावकऱ्यांविरोधात दाखल करण्यात आला आहे. पीडितेला आणि आरोपीला मारहाण करुन त्यांची धिंड काढल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत आणि लैंगिक अपराधांपासून लहान मुलांच्या संरक्षण कायद्यातील तरतुदींखाली(पॉस्को) गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस अधिकारी दिलीपसिंह बिल्वाल यांनी सांगितले.