Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiPoliceNewsUpdate : नव्या पोलीस आयुक्तांकडून ८६ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडका फडकी बदल्या

Spread the love

मुंबई :  मुंबई क्राइम ब्रांचमधील निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना झालेली अटक, त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची करण्यात आलेली उचलबांगडी आणि पाठोपाठ परमबीर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टाकलेला लेटरबॉम्ब अशा वादळी घटनाक्रमानंतर मुंबई पोलीस दलात आज  गुन्हे शाखेतील तब्बल ६५ अधिकाऱ्यांचीही उचलबांगडी करण्यात आली आहे . विशेष म्हणजे  त्यात निलंबित सचिन वाझे यांच्या सीआययु युनिटचे एपीआय रियाझुद्दीन काझी व प्रकाश होवाळ यांचीही बदली करण्यात आली आहे.

दरम्यान गुन्हे शाखेच्या सीआययू पथकातील अधिकारी सचिन वाझे यांच्यामुळे संपूर्ण मुंबई पोलीस दल अडचणीत सापडल्यामुळे मंगळवारी निरीक्षक, सहायक निरिक्षक, उपनिरीक्षक दर्जाच्या ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये गुन्हे शाखेच्या ६५ पोलिसांचा समावेश आहे. ॲंटिलिया स्फोटकं प्रकरण आणि त्यानंतर मनसुख हिरन यांची हत्या यामध्ये सचिन वाझे याच्यासह काही पोलिसांचा सहभाग आढळल्याने मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन झाली. मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा सांभाळल्यानंतर हेमंत नगराळे यांनी पोलीस दलात फेरबदल करण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार मंगळवारी ८६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. सीआययू मधील सचिन वाझे यांचे सहकारी आणि एनआयएच्या चौकशीला सामोरे गेलेले एपीआय रियाझुद्दीन काझी यांची सशस्त्र दलात तर प्रकाश होवाळ यांची मलबार हिल पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

गुन्हे शाखेत जास्त कालावधी काढलेल्या अधिकाऱ्यांना हटविण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी सचिन वाझे प्रकरणामुळेच घाऊक बदल्या करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाशी काहीच संबंध नसतानाही बदलीचा फटका बसल्याने पोलिसांमध्ये प्रचंड नाराजी आहे. विशेष म्हणजे या बदल्या निवासस्थानापासून लांब ठिकाणी केल्यामुळे पोलिसांमध्ये असंतोष आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!