Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : खैरे -दानवे यांच्यात पुन्हा जुंपली , मला खैरे कळले नसतीलही , शिवसेना कळते , आ. दानवे यांचा खैरे यांच्यावर पलटवार

Spread the love

औरंगाबाद ।  औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीवरून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांच्यातच जुंपल्याचे चित्र कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा पाहावयास मिळत आहे . तसेही खैरे आणि दानवे यांच्यात कायम कुठल्या ना कुठल्या विषयावरून वाद असतातच याही वेळी ते होत आहेत.   शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गुरुवारी कोण आहे अंबादास दानवे ?  माझ्यापेक्षा वरिष्ठ आहे का, असे विधान केले असतानाच आज शिवसेना आमदार, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी गेल्या दहा वर्षात माझ्याबाबत २५ तक्रारी वरिष्ठांकडे केल्या आहेत, असे विधान करत पलटवार केला आहे. खैरे यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली असावी, असेही त्यांनी नमूद केले आहे. शेतकरी विकास पॅनलतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार दानवे बोलत होते.


या मुद्द्यावर पत्रकारांशी बोलताना आ. दानवे म्हणाले की, पॅनलमध्ये शिवसेना नेते मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांच्यासह एकूण सहा शिवसैनिक उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. यासह भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे, माजी आमदार नितीन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश  चव्हाण यांच्यासह सर्वच पक्षातील लोक आहेत. मी सहकारी बँक निवडणूक प्रथम लढत असून गेल्या वेळीही सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते होते,असेही आमदार दानवे यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेना नेते खैरे यांनी गुरुवारी शेतकरी सहकार बँक विकास पॅनलतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत अनेकांना पक्षाची शिस्त माहित नाही, असे विधान केले होते. तसेच कोण दानवे, असे विधानही एका प्रश्नावर बोलताना केले होते. याबाबत आमदार दानवे यांना विचारले असता त्यांनी खैरे हे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक असल्याचे सांगितले. पक्ष शिस्तीबाबत खैरे यांनी केलेल्या विधानाबाबत माहिती नाही परंतु मला बोलवून ते सांगू शकले असते. मी ऐकले असतेच. पत्रकार परिषदेत सांगणे ही काय शिस्त आहे का, असा टोला दानवे यांनी मारला. तसेच माजी खासदार खैरे यांनी गेल्या दहा वर्षात माझी २५ वेळा वरिष्ठांकडे तक्रार केल्याचेही दानवे यांनी सांगितले. त्यावर तुम्ही त्यांची तक्रार करणार का असे विचारले असता, मी कोणाचीच तक्रार करत नाही आणि करणारही नाही, असे दानवे म्हणाले. खैरे यांनी मनातील खदखद व्यक्त केली असावी, असेही एका प्रश्नावर बोलताना ते म्हणाले. खैरेंना काय मी कोणालाही घाबरत नाही, असे विधानही दानवे यांनी यावेळी केले.

मला खैरे कळण्याची आवश्यकताच नाही, शिवसेना मला कळते

आ. अंबादास दानवे हे साइड ट्रॅक करतात असे खैरे यांना वाटते, असे विचारले असता, साइड ट्रॅक कोण करत असतं? हे काम मोठा माणूस करतो. लहान माणूस ते करत नाही. येथे ते मोठे आहेत. त्यामुळे त्यांना साइड ट्रॅक करणारा मी कोण आहे?, असा प्रतिसवाल दानवे यांनी विचारला. शिवसेनेच्या १३ वरिष्ठ नेत्यांमधला मी एक आहे असे खैरे वारंवार सांगत असतात. ते महाराष्ट्राचे  आणि देशाचे  राजकारण करतात. त्यांच्यापुढे मी जिल्हा पातळीवर काम करणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझ्यासारख्या एका जिल्हाप्रमुखाने त्यांना साइड ट्रॅक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही दानवे म्हणाले. दानवेंना खैरे कळले नाहीत, असे खैरे सांगत आहेत अशी विचारणा केली असता कदाचित मला खैरे कळले नसतीलही. मी म्हणतो मला खैरे कळण्याची आवश्यकताच नाही. मी शिवसेनेत काम करतो आणि मला शिवसेना कळण्याची आवश्यकता आहे व संघटना मला चांगली कळली आहे, अशी टोलेबाजीही दानवे यांनी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!