Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : अखेर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल

Spread the love

मुंबई : मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या फिर्यादीवरुन अखेर महाराष्ट्र एटीएसने मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता राज्यसरकारने हा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे वर्ग  केला  आहे. दरम्यान, आज एटीएसचे  पथक मनसुख हिरेन यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झाले  होते. त्यावेळी मनसुख हिरेन यांची आत्महत्या नसून हत्या झाली असल्याचा आरोप हिरेन यांच्या कुटुंबियांनी केला होता. आज अखेर विमला हिरेन यांच्या फिर्यादिवरुन मनसुख हिरेन प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान आज तपास पथकाने हिरेन यांच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवून घेतले. आज झालेल्या चौकशीमध्ये हिरेन यांच्या कुटुंबियांनी एटीएसला ही आत्महत्या असू शकत नाही, हा खून असल्याचे सांगून  या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या मुलानेही  केली होती. आतापर्यंत या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती.  एटीएसच्या पथकाने  मनसुख हिरेन यांच्या घरी तब्बल साडेतीन तास चौकशी केली. त्यानंतर त्यांच्या पत्नीच्या फिर्यादिवरून हत्येचा गु्न्हा दाखल करण्यात आला.

एटीएसकडून तपासाला वेग

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवला असल्याची माहिती दिली होती. अशातच एटीएसने याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे. ज्या ठिकाणी मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला होता, त्याठिकाणी एटीएसच्या पथकाने  भेट दिली आहे. एटीएसचे प्रमुख शिवदीप लांडे आपल्या टीमसोबत घटनास्थळी दाखल झाले होते. तिथे त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. एटीएसच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसचे  पथक संपूर्ण घटना समजून घेऊन क्राईम सीनही रिक्रिएट करणार आहे. तसेच एटीएसचे  पथक संपूर्ण परिसरातील फोटेजही तपासत असून घरातून निघाल्यानंतर मनसुख हिरेन नेमके कुठे गेले, याचा शोध घेण्याचा एटीएसचे  पथक प्रयत्न करत आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी एटीएसच्या तपासाला वेग आला असून एटीएसच्या तपासातून काय निष्पन्न होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!