Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate :  ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे काळाच्या पडद्याआड

Spread the love

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे (वय-९१) यांचे शनिवारी  पुण्यातील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. एकेकाळी मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रांत ‘चॉकलेट हिरो’ अशी प्रतिमा असलेले नायक, वसंत कानेटकर यांच्या ‘लेकुरे उदंड जाली’ नाटकामधील राजशेखर ऊर्फ राजा, पु. ल. देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’मधील बोरटाके गुरुजी, ‘वाऱ्यावरची वरात’मध्येच ‘दिल देके देखो’ या गीतावर रंगमंचावर अक्षरश: शम्मी कपूर शैलीत नृत्य करून रसिकांना मनमुराद आनंद देणारे कलाकार अशी नटश्रेष्ठ श्रीकांत मोघे यांची ओळख होती.

सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथे ६ नोव्हेंबर १९२९ रोजी त्याचा जन्म झाला होता. श्रीकांत मोघे हे नाटय़, चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेता याबरोबरच ते चित्रकार व वास्तुविशारद, उत्तम सुगम संगीत गायकही होते. रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अर्धशतकाहून अधिक काळ रसिकांवर आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवणारे श्रीकांत मोघे यांचे वडील कीर्तनकार होते.

श्रीकांत मोघे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्करवाडी येथे आणि इंटरपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत विलिंग्डन कॉलेजात झाले. बी.एस्‌‍सी साठी ते पुण्याच्या स.प.कॉलेजात आले. पुढे मुंबईला जाऊन त्यांनी बी.आर्च. ही पदवी घेतली. शाळेत असतानाच ते नाट्य अभिनयाकडे वळले. महाविद्यालयात शिकत असताना भालबा केळकर यांच्या‘बिचारा डायरेक्टर’ या नाटकाचे दिग्दर्शनही श्रीकांत मोघे यांनी केले होते. त्यांनी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये ‘घराबाहेर’तसेच आचार्य अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ या नाटकांचे प्रयोग केले  होते. तसेच, त्यांनी साठांहून अधिक नाटकांत आणि पन्नासहून अधिक चित्रपटांत कामे केली आहेत.

’पुलकित आनंदयात्री’ या एकपात्री प्रयोगासाठी श्रीकांत मोघे यांनी अमेरिका, युरोप, दुबई अशा ठिकाणचा दौरा केला होता. श्रीकांत मोघे यांनी १९५१-५२ मध्ये पुण्यात आल्यानंतर शरद तळवलकर यांच्या हाताखाली पु. ल. देशपांडे यांचे ‘अंमलदार’सादर केले. त्या प्रयोगाला वाळवेकर ट्रॉफी मिळाली होती. पुण्याच्या महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेने १९५५ साली झालेल्या राज्य शासनातर्फे आयोजित पहिल्या राज्य नाट्यस्पर्धेत मामा वरेरकर यांचे ‘अपूर्व बंगाल’ हे नाटक सादर केले. यातील प्रमुख भूमिकेसाठी श्रीकांत मोघे यांना राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले. नृत्य करून रसिकांना मनमुराद आनंद देणारे कलाकार अशी नटश्रेष्ठ श्रीकांत मोघे यांची ओळख होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!