Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अंबानींच्या च्या घरासमोरील घटनाक्रम संशय निर्माण करणारा… फडणवीस यांनी केले गंभीर आरोप

Spread the love

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळ ज्या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिनचा साठा सापडला होता. या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच महत्वाची माहिती समोर आली आहे. त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह कळवा खाडीत आज आढळून आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला आहे. मनसुख हे ठाण्यातील नौपाडा येथे राहत होते. आज सकाळी १०.२५ मिनिटांनी मनसुख यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. आज दुपारी नौपाडा पोलिस ठाण्यात मनसुख बेपत्ता असल्याची कुटुंबीयांनी तक्रार केली होती.

आज विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, रेतीबंदर येथे हा मृतदेह सापडला आहे. “या प्रकरणात मनसुख हिरेन सर्वात महत्वाचा दुवा आहे, जे या गाडीचे मालक आहेत. त्यांना तात्काळ सुरक्षा दिली पाहिजे अशी मागणी केली असतानाच त्यांचा मृतदेह मुंब्र्याच्या जवळ सापडला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे हे प्रकरण फक्त गंभीर नाही तर अत्यंत गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक झाले आहे. हे जे काही योगायोग आहेत त्यातून संशय निर्माण झाले आहेत. महत्वाच्या प्रकरणातील इतक्या महत्वाच्या साक्षीदाराचा मृतदेह मिळते, यामागे काहतरी गौडबंगाल असल्याचे दिसत आहे. त्यामुळे तात्काळ हे प्रकरण एनआयकडे वर्ग केले पाहिजे आणि सत्य समोर आले पाहिजे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. “इतकी माहिती जर माझ्याकडे येऊ शकते तर ती गृहमंत्र्यांकडे जाणार नाही असे मला वाटत नाही. त्यामुळे गृहमंत्री याबाबत स्पष्ट भूमिका का मांडत नाहीत हा प्रश्न आहे. सोबतच इतकी माहिती बाहेर आल्यानंतरही प्रकरण एनआयएकडे देणार की नाही हादेखील महत्वाचा प्रश्न आहे,” असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. “चौकशी सुरु असतानाच इतक्या महत्वाच्या साक्षीदाराचा मृतदेह सापडणे याचा अर्थ याला वेगळ्या तपासाची गरज आहे. मनसुख हिरेन यांच्या व्हॉट्सअप कॉलची चौकशी केली पाहिजे. त्यामधून अनेक गोष्टी बाहेर येतील. मी राज्याला विनंती केली असून केंद्रालाही करणार आहे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे.

दरम्यान, विधानसभेत फडणवीस यांनी गंभीर आरोप केले केले आहेत ते म्हणाले, “मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एक गाडी सापडली. हा घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे. वाहन सापडल्यावर टेलीग्रामवर एक ग्रुप तयार झाला आणि त्यावर एक पत्र आले ‘जैश उल हिंद’ नावाने. एक क्रिप्टो करंसी अकाऊंट दिले होते. पण तसे कुठले खातेच नव्हते,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.दरम्यान, त्यांनी धमकीचे पत्र वाचून दाखवत सांगितले की, “यामधून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ही एकच गाडी तिथे आली नव्हती, त्या ठिकाणी दोन गाड्या आल्या होत्या. या दोन्ही गाड्या एकाच मार्गाने आल्या असून ठाण्यातूनच आल्या आहेत. गाडी ओळखल्याबरोबर पोलीस अधिकारी सचिन वझे पहिल्यांदा पोहोचले. कोणीही पोहोचण्याआधी ते पोहोचले नंतर क्राइमचे, स्थानिक पोलीस ठाण्याचे आणि इतर लोक आले. नंतर सचिन वझे यांनी तपास अधिकारी म्हणून नेमण्यात आले. तीन दिवसांपूर्वी एका एसीपीला तपास अधिकारी म्हणून नेमले असून, सचिन वझेंना का काढले?  हे समजलं नाही” पुढे ते म्हणाले की, “योगायोग म्हणजे ज्यांची गाडी चोरीला गेली, त्यांच्याशी एका क्रमांकावर अनेक वेळा संवाद झाला आहे. सचिन वझे यांचा तो नंबर असल्याचे समोर आले आहे. ज्या दिवशी गाडी ठाण्याला बंद पडली, त्यानंतर ओला घेऊन तो कॉफर्ड मार्केटला गेला. तिथे तो एका व्यक्तीला भेटला. ती व्यक्ती कोण हा माझा प्रश्न आहे. तो कोणाला भेटला, हे जर काढले तर अनेक गोष्टी स्पष्ट होतील. ज्या ओलामध्ये बसून गेला त्याचे रेकॉर्ड आहे. तो कोणाला भेटला हे ओला कॅब चालकाने पाहिले आहे. अशा परिस्थितीत वझे ठाण्यातील, गाडी ठाण्यातील आणि या दोघांचे आधीपासून संवाद हे खूपच योगायोग असून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गाडी दिसल्याबरोबर वझे तिथे पोहोचले. धमकीचे पत्रही सचिन वझे यांना प्राप्त झाले. त्यांनीच ते टेलीग्रामवर टाकले. शंकेला वाव देणारे बरेच पुरावे आहेत. त्यामुळे ही संपूर्ण चौकशी एनआयएला द्यावी, अशी आमची मागणी आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचा चेसिस क्रमांक आणि इंजीन क्रमांक घासून काढण्यात आला होता. मात्र, वाहन जुने असल्यामुळे काचेवर असलेल्या क्रमांकावरून तिची ओळख पटली होती. तपासात ती कार मुलुंड उड्डाणपुलाखालून चोरी केल्याची माहिती समोर आली व याबाबत विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ठाणे परिसरात राहणारे हिरेन मनसुख यांची ही स्कॉर्पिओ असल्याचे तपासात आढळून आले होते. लॉकडाऊनमुळे ती कार बरेच दिवस बंद होती. दरम्यान, १७ फेब्रुवारी रोजी ऑपेरा हाउस येथे काम असल्याने त्यांनी कार दुरुस्त करून घेतली. दुपारच्या सुमारास ऐरोली ब्रिजपर्यंत पोहोचताच कारचे स्टेअरिंग जाम झाल्यामुळे तेथीलच सर्विस रोडवर ती पार्क करून मनसुख पुढे निघून गेले. १८ फेब्रुवारी रोजी कार पार्क केलेल्या ठिकाणी गेल्यावर कार तेथे नसल्याने विक्रोळी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती. स्कॉर्पिओ जुनी असल्यामुळे जुन्या वाहनाच्या काचेवरील कोपऱ्यात वाहनाचा क्रमांक टाकण्यात आला होता. आरोपींनी वाहनाची ओळख पटू नये म्हणून कारचा चेसिस आणि इंजीन क्रमांक घासला होता. पण, काचेवरील क्रमांकामुळे कारची ओळख पटली. तपासात ती चोरी झाल्याचे समजताच पोलिसांनी कार मालकाला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी सुरू केली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!