Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : कर्नाटकातील मंत्रीही अश्लील व्हिडीओमुळे अडचणीत

Spread the love

बेळगाव | महाराष्ट्रातील मंत्री संजय राठोड यांचे प्रकरण गाजत असतानाच कर्नाटकच्या भाजपच्या मंत्र्याचा एका तरुणीसोबत लगट करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे. कर्नाटक राज्याचे जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांचा हा आक्षेपार्ह व्हिडीओ आहे. ते बेळगावचे पालकमंत्री आहेत.


नोकरीच्या निमित्ताने जवळीक साधून युवतीवर अत्याचार केल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. रमेश जारकीहोळी यांनी नोकरीच्या आमिषाने युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे. दिनेश कलहळ्ळी यांनी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या अनैतिक संबंधाची सीडी सार्वजनिक केली आहे.

दरम्यान दिनेश कलहळ्ळी यांनी आज शहराचे पोलीस आयुक्त कमल पंत यांची भेट घेऊन या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे. आपल्या तक्रारीत दिनेश कलहळ्ळी यांनी म्हटले आहे की, “रमेश जारकीहोळी यांनी केपीटीसीएलमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने वारंवार 25 वर्षीय तरुणीचे  लैंगिक शोषण केले ” परंतु नंतर तिला नोकरी देण्यास नकार दिल्याचे समजल्यानंतर तरुणीने त्या दोघांमधील रेकॉर्ड केलेले वैयक्तिक क्षण सार्वजनिक करण्याचा इशारा दिल्यानंतर मंत्री रमेश जारकीहोळी यांनी तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली, असेही दिनेश कलहळ्ळी यांनी तक्रारीत म्हटले आहे. आज व्हायरल झालेला व्हिडीओ महिनाभरापूर्वीचा असल्याचे वृत्त आहे . हा प्रकार बंगळुरुच्या कबॉन पार्क पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हॉटेलमध्ये घडला. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी कलहळ्ळी यांना कबॉन पार्क पोलिसात तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे.

तरुणीच्या कुटुंबीयांनी दिनेश कलहळ्ळी यांच्याकडे गाऱ्हाणं मांडल्यानंतर ते पोलिसांत पोहोचले. यावेळी तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याने सुरक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. हे संवेदनशील प्रकरण असल्याने गुन्हा दाखल करण्यापूर्वी आम्ही अंतर्गत चौकशी करु, असे  उत्तर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मंत्री  रमेश जारकीहोळी हे कर्नाटकातील मोठे राजकीय प्रस्थ असून कर्नाटकात भाजपची सत्ता आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. काँग्रेसमधून बंडखोरी करत त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. परंतु आता जारकीहोळी यांच्या सीडीमुळे कर्नाटकातील विरोधीपक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे. दरम्यान त्या सीडीची चौकशी होऊ द्या. चूक असेल तर मला फाशी द्या, अशी प्रतिक्रिया रमेश जारकीहोळी यांनी या प्रकरणावर दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!