हुंडाप्रतिबंधक गुन्हा पतीच्या मैत्रीणीविरुध्द दाखल होऊ शकत नाही, खंडपीठाचा निकाल

औरंगाबाद – बाईच्या नादाला लागून पतीने मैत्रीणीसोबत मिळून पत्नीचा छळ केल्यास हुंडा प्रतिबंधक गुन्हा पतीच्या मैत्रीणीविरुध्द दाखल होऊ शकत नाही असा निकाल न्यायमूर्ती टि.व्ही.नलावडे आणि न्या. एम.जी.सेवलीकर यांच्या खंडपीठाने दिला.
२०१८ साली सिडकोचे वरिष्ठ अधिकारी मोहन मुंढे यांच्या सहित त्यांचे आई वडिल आणि मैत्रीण रुपाली जैन यांच्या विरोधात हुंडाप्रतिबंधक कायद्या अतर्गत गुन्हा मोहन यांची पत्नी वर्षा मुंढे यांनी दिलेल्या तक्रारी वरुन सातारा पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. त्या गुन्ह्याच्या विरोधात मोहन मुंढे यांची मैत्रीण रुपाली जैन यांनी खंडपीठात धाव घेतली होती.
वरील गुन्ह्यात रुपाली जैन यांच्याकडे मोहन मुंढे यांचे वास्तव्य होते. या घटनेमुळे त्रस्त झालेल्या मुंढे याच्या पत्नीने रुपाली जैन यांना नवर्याला घरी पाठव असे सुनावले त्यामुळे रुपाली जैन यांनी वर्षा मुंढे यांना घरी बोलावून नवरा हवा असल्यास दीड कोटी रु,ची मागणी करुन पैसे न दिल्यास हातपाय तोडण्याची धमकी दिली. या प्रकरणात न्या. नलावडे आणि न्या.एम.जी. सेवलीकर यांच्या खंडपीठाने जैन यांच्या विरोधात पोलिसांनी लावलेले कलम रद्द केले. तर पती मोहन आणि त्यांच्या आई वडीलांच्या विरोधात कायम केले तर रुपाली जैन यांच्या विरोधात जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार देण्याचे आदेश दिले आहेत. वरील प्रकरणात वर्षा मुंढे यांच्यावतीने अँड. प्रशांत नागरगोजे यांनी काम पाहिले.