Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सरकार फक्त ४ जण चालवत आहेत , हम दो , हमारे दो… राहुल गांधी यांचा मोदींवर घणाघात

Spread the love

हे सरकार फक्त ४ जण चालवत आहेत. ‘हम दो, हमारे दो’ असे म्हणत राहुल गांधींनी आज लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना नवीन तीन कृषी कायद्यांवरून विरोधकांवर टीका केली होती. आता राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, भाषणाच्या शेवटी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांनी शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना आदरांजली वाहिली

मोदी सरकारने लागू केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांमधील त्रृटी यावेळी राहुल गांधी यांनी सांगितल्या. तसेच तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत असे सांगत हा देश केवळ चार लोक चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तीन नवीन कृषी कायद्यांतील पहिल्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना आपला माल बाजार समित्यांच्या बाहेर कुठेही विकता येणार आहे. मग बाजार समित्यांमध्ये जाणार कोण? बाजार समित्या बंद पाडण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला.

राहुल गांधी म्हणाले की, पहिल्या कृषी कायद्यामध्ये बाजारसमित्या बंद करण्याचा उल्लेख आहे. दुसऱ्या कृषी कायद्यात कोणताही उद्योजक हवे तेवढे धान्य, फळ आणि भाजीची साठवणूक करु शकतो. साठेबाजीला प्रोत्साहन देणे हे या कायद्याचे लक्ष्य आहे. तर तिसऱ्या कायद्यात जर एखाद्या शेतकऱ्यांने देशातील सर्वात मोठ्या उद्योजकाकडे भाजी आणि धान्यासाठी योग्य दर मागितला तर त्याला न्यायालयात जाण्यास परवानगी नसेल.

“शेतकरी हा देशाच्या पाठिचा कणा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचा कणाच मोडण्याचा घाट घातला आहे. माझ्याकडून तुम्ही लिहून घ्या शेतकरी एक इंचही मागे हटणार नाही”, असे ठाम विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत केले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना बुधवारी (10 फेब्रुवारीला) म्हटले होते की, तीनही कृषी कायद्यांचा विषय आणि उद्देश यावर चर्चा झालेली नाही. त्याच वक्तव्यावर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर पलटवार केला आहे. राहुल गांधी यांच्या भाषणावेळी भाजपच्या खासदारांनी जोरदार गदारोळ केला. यानंतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना बजेटवर चर्चा करण्यास सांगितले. लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर बोलत असताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघे देशातील दोन बड्या उद्योगपतींसाठी देश चालवत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. “देश फक्त हम दो आणि हमारे दो यांच्यासाठीच चालवलं जात आहे. यात हम दो आणि हमारे दोन कोण आहेत हे आता संपूर्ण देशाला माहित झाले आहे. हे फक्त शेतकऱ्यांचे आंदोलन आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर ही मोठी चूक आहे. हे शेतकऱ्यांचे  नाही, तर संपूर्ण देशाचे आंदोलन आहे. मी आजही लिहून देतो की कृषी कायदे रद्द केल्याशिवाय शेतकरी एक इंचही मागे हटणार नाही. मोदींना कृषी कायदे रद्द करावेच लागतील”, असे राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले.

दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकरी आंदोलकांमध्ये आतापर्यंत अनेकांचा जीव गेला याबाबत मोदी सरकार भावनाशून्य असल्याचे म्हणत राहुल गांधी यांनी केंद्रावर जोरदार टीका केली. आंदोलनात जीव गमवावा लागलेल्या शेतकऱ्यांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत श्रद्धांजली देखील अर्पण केली नाही हे दुर्दैव असल्याचे म्हणत राहुल गांधी यांनी आपल्या भाषणानंतर काँग्रेसच्या खासदारांना दोन मिनिटांचे मौन धारण करुन आंदोलनात जीव गमवावा लागलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन केले.

#Live | Budget2021| Loksabha Live 11.Feb.2021
Like| Share| Subscribe

आपलं सरकार

Click to listen highlighted text!