Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचे संसद घेराव आंदोलन

Spread the love

नवी दिल्ली |  शेतकरी आंदोलन चिरडू पाहणाऱ्या मोदी सरकारच्या  विरोधात आता काँग्रेस पक्षाचा वतीने येत्या 9 फेब्रुवारी रोजी संसद घेरावचे  आवाहन करण्यात आले असल्याची  माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे.  या आंदोलनाचा एक भाग म्हणून संयुक्त किसान मोर्चाने गेल्या 6 फेब्रुवारीला देशभर चक्काजाम आंदोलन केले होते. दरम्यान ‘कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर  गेल्या 72 दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांकडे नरेंद्र मोदी सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत काँग्रेस या आंदोलनात उतरत आहे.

काँग्रेसने मोदी सरकारवर टीकेची झोड उठवताना आरोप केला आहे कि ,  ‘दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांवर मोदी सरकारने अनन्वीत अत्याचार सुरु केले आहेत. आंदोलक शेतकऱ्यांना अन्न-पाणी मिळू नये अशी कोंडी मोदी सरकारकडून केली जात आहे. दिल्लीत प्रवेश करू नये म्हणून रस्त्यांवर मोठे बॅरिकेड्स लावून तटबंदी उभी केली आहे. रस्त्यावर खिळे ठोकले आहेत, इंटरनेट सेवाही बंद केली आहे. मोठा पोलीस फौजफाटा लावून शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा वाढत असून मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे भारताची जगभऱ नाचक्की होत आहे,त्याचमुळे आता संसद घेराव करण्यात येणार आहे,’ असं काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.

याबाबत काँग्रेस पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले  आहे की, देशाचा अन्नदाता आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे. परंतु केंद्रातील भाजपाचे हुकूमशाही सरकार त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. कृषी कायदे हे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहेत. त्यामुळेच ते रद्द करावेत, ही मागणी लावून धरत महाराष्ट्रासह देशभर आंदोलन करुन काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला आहे. कृषी कायदे मंजूर करवून घेताना संसदेत चर्चा केली नाही. विरोध तीव्र होत असताना आता मात्र मोदी सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करत असल्याचे केवळ नाटक करत आहे. संसद घेराव आंदोलनासाठी काँग्रेसने मोठी तयारी केली असून दिल्ली काँग्रेससह देशभरातील कार्यकर्त्यांना संसद घेरावमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले  आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!