Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

विधान परिषद नियुक्त्यांवरून संजय राऊत यांनी दिला इशारा

Spread the love

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या १२ उमेदवारांच्या नावांना अद्याप मान्यता न दिल्याने महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत या मुद्द्यावरून राज्यपालांना इशारा दिला आहे. ‘राज्यपालांनी आम्हाला कोर्टात जायला लावू नये,’ असे राऊत यांनी म्हटले आहे.

राज्यपाल कोट्यातून भरावयाच्या विधान परिषदेतील १२ जागा सध्या रिक्त आहेत. राज्य मंत्रिमंडळाने त्यासाठी नावांची शिफारस राज्यपालांना केली आहे. सर्व बाजूने विचार करून आणि नियम-अटींचे पालन करून सरकारने ही नावे पाठवली आहेत. मात्र, नावांची शिफारस करून दोन महिने उलटल्यानंतरही राज्यपालांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते संतापले आहेत. राज्यपालांनी आमचा अंत पाहू नये, असा इशारा कालच अजित पवार यांनी या संदर्भात बोलताना दिला होता. त्यानंतर आज संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य करताना राज्यपालांवर टीका केली आहे.

‘राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. मात्र, राज्यपाल घटनाबाह्य वागत आहेत. १२ आमदारांची नियुक्ती राजकीय नाही. सरकारने केलेल्या शिफारशी स्वीकारणे राज्यपालांना बंधनकारक आहे. मात्र, राज्यपाल त्यावर निर्णय घेत नाहीत. त्यांनी आम्हाला कोर्टात जाण्यास भाग पाडू नये,’ असे राऊत म्हणाले. ‘केंद्राने राज्यपालांना परत बोलवावे ,’ अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सरकारमधील बदलांची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा अध्यक्षपद अन्य पक्षाला देऊन काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्याचीही चर्चा सुरू आहे. मात्र, संजय राऊत यांनी ही चर्चा फेटाळली. सरकारमध्ये एकापेक्षा जास्त उपमुख्यमंत्री नसतील आणि विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडंच राहील, असे ठरल्याचे त्यांनी सांगितले .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!