Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CurrentNewsUpdate :मुंबईतील मानखुर्द येथील स्क्रॅप गोदामाला भीषण आग

Spread the love

मुंबईतील गोवंडी येथील घाटकोपर लिंक रोडवरील मानखुर्द मंडाला परिसरात असलेल्या कुर्ला स्क्रॅप गोदामला शुक्रवार (दि. ५) रोजी दुपारीअडीच वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संध्याकाळ पर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे २० बंब, ९ टँकर, १ रेस्क्यू वाहन आणि ३ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या आगीत रात्री पर्यंत ६० ते ७० गोदाम जळून खाक झाले असल्याचे वृत्त आहे.

मुखतः या ठिकाणी केमिकल, काळे तेल, लाकडी साहित्य, साबण बनविण्यासाठी लागणारे केमिकल, प्लॅस्टिक अशी ज्वलनशील पदार्थ साठवलेली शेकडो गोदामे आहेत. यातीलच एक गोदामाला शुक्रवारी अडीच वाजताच्या दरम्यान प्रथम आग लागली. ही आग पसरत बाजूच्या गोदामात लागली आणि प्रचंड मोठे स्फोट या आगीमुळे होऊ लागले. सुदैवाने इथे काम करणारे अनेक कामगार त्वरित बाहेर पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र रात्री उशिरा पर्यंत आग धगधगत असल्याने आगीत कोणी अडकले होते का? याचा शोध लागणे बाकी आहे. या आगीचे प्रचंड लोट अगदी तीन ते चार किलोमीटर लांबून दिसत होते. तर धूर हा अगदी घाटकोपर, चेंबूर कुर्ला परिसरातून देखील दिसत होता.

आगीची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या ठिकाणी मोठ्या प्रमाणत अनधिकृत गोदाम असल्याचा आरोप स्थानिक करीत असल्याने त्यांनी सदर ठिकाणी असे काही असेल तर त्यावर कारवाई केली जाईल. सध्या आग विझविणे महत्त्वाचे आहे. सदर जागा ही जिल्हाधिकारी यांची असून इथे वारंवार अतिक्रमण होत असल्याने या वर त्यांच्याकडून आणि पालिकेकडून कारवाई होत असते. मात्र पुन्हा हे भूमाफिया या वर हे अनधिकृत साम्राज्य उभे करीत आहेत. या बाबत माहिती घेऊन नक्कीच कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया महापौरानी या वेळी दिली आहे.

या आगीमुळे घाटकोपर मानखुर्द लिंक रोड ची नवी मुंबईकडे जाणारी वाहतूक देखील ट्रोमबे वरून वळविण्यात आली होती. रात्री उशिरा पर्यंत ही आग विझविताना तीन अग्निशमन दलाचे जवान किरकोळ जखमी झाले होते. तर विभागात प्रचंड धूर झाल्याने श्वास घेण्यास देखील नागरिकांना मोठा त्रास होत होता. मात्र रात्री पर्यंत यात कोणती जीवितहानी समोर आली नव्हती. मात्र, या आगीत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. गेल्या काही वर्षात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदाम आणि त्यात अनधिकृत साहित्य साठवणूक सुरू आहे. यातच वारंवार याच ठिकाणी भीषण आग लागण्याच्या घटना घडत असल्याने यातून संशयाचा धूर येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!