Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरु

Spread the love

जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने राज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांच्या 50 टक्के उपस्थितीने सुरु करण्याचे आदेश राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. तसेच कोरोना संकट पाहता विद्यार्थ्यांना तूर्तास 75 टक्के सक्तीच्या उपस्थितीची अट बंधनकारक नसेल असेही त्यांनी म्हटले आहे.

याबाबतचा निर्णय जाहीर करताना उदय सामंत यांनी म्हटले आहे की, “महाविद्यालये सुरु करत असताना एक महत्त्वाची भूमीका विद्यापिठांची किंवा खाजगी विद्यापिठांची असली पाहिजे. यूजीसीने म्हटले आहे की, विद्यार्थ्यांच्या वर्गांची संख्या, त्यामध्ये किती विद्यार्थी बसण्याची व्यवस्था आहे. त्या बसण्याच्या व्यवस्थेच्या 50 टक्के रोटेशन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या संख्येसह महाविद्यालयं सुरु करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे. म्हणजेच, 50 टक्के उपस्थितीसह महाविद्यालये सुरु केली जातील.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “महाविद्यालये सुरु करण्यासाठी युजीसीने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, संबंधित यंत्रणा, जिल्हाधिकारी यांना पायाभूत सुविधांची माहिती दिली पाहिजे. अर्थात आपल्या जिल्ह्यातील कोरोनाची पार्श्वभूमी पाहून हा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे. त्यानंतर 50 टक्के उपस्थितीसह महाविद्यालये सुरु करण्यात यावी. ही विद्यापीठं महाविद्यालयं 15 फेब्रवारीपासून सुरू करू शकतात”

“महाविद्यालयं सुरु होत असताना वसतीगृहांचा जो प्रश्न आहे. तो टप्प्याटप्प्यानं सुरु करण्याचे अधिकार विद्यापिठांकडे देण्यात आले आहेत. पण सध्या 15 फेब्रुवारी रोजी सुरु होताना फक्त कॉलेज सुरु होतील.” असं उदय सामंत यांनी सांगितलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन, म्हणजेच विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार घेण्यात याव्यात, अशी चर्चा विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या बैठकीत झाली. त्यामुळे हा निर्णयही विद्यापीठानं घ्यावा. तसेच विद्यार्थ्यांना दोन्ही पर्याय खुले ठेवावेत, अशी परवानगी महाराष्ट्र शासनाने दिली आहे.”

दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च 2020 पासून राज्यातील शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठं बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. परंतु, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन वर्ग सुरु करण्यात आले होते. आता हळूहळू सर्व पूर्वपदावर येत आहे. शाळा देखील टप्प्याने सुरु करण्यात येत आहेत. मात्र राज्यातील विद्यापीठे कधी सुरु होणार असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. अशातच उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!