Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#UnionBudget2021-22 : अर्थसंकल्पाने जनतेला पुन्हा एकदा मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवले – अजित पवार

Spread the love

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर अजित पवार यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. करोना विषाणूवर लस शोधून देशातील शास्त्रज्ञांनी जनतेला जीवनदान दिले असताना केंद्राच्या आजच्या अर्थसंकल्पाने देशातील जनतेला पुन्हा एकदा मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवले आहे, दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपासून गेल्या कोरोनाकाळात रोजगार गमावलेल्या कोट्यवधी युवकांना या बजेटने निराश केले आहे. मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्यांक बांधवांवर अन्याय करण्याची परंपरा, या अर्थसंकल्पातही कायम आहे. महिलांसाठी कुठलीही भरीव तरतूद नाही. देशाच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रावर यावेळीही अन्याय झाला आहे. महाराष्ट्रावरील अन्याय दूर करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील जनतेला न्याय्य हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यांबाबतही अर्थमंत्री बोलल्या. क्रिकेटचा सामना नशिबानं साथ दिल्यास एकवेळ जिंकता येतो, परंतु देशाच्या अर्थसंकल्पारखी गोष्ट नशिबावर सोडून चालणार नाही, हे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी समजून घ्यायला हवे होते. केंद्रीय अर्थसंकल्प हे आत्मनिर्भर बजेट असल्याचा ट्रेंड ट्विटरवर चालवला जातोय, परंतु हे आत्मनिर्भर नव्हे तर देशाला बरबादीकडे नेणारे अस्ताव्यस्त बजेट असल्याची टीका अजित पवार यांनी केली. ‘आयएएनएस-सी व्होटर बजेट ट्रॅकर’च्या सर्वेक्षणातून केंद्र सरकारची आर्थिक कामगिरी आजवरची सर्वात वाईट असल्याचे समोर आले आहे. महागाईमुळे बहुतांश जणांना खर्चाचा ताळमेळ राखणे कठीण झाले असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलेले दावे हे स्वप्नांचे इमले आणि शब्दांचे फुलोरे आहेत, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. ‘आत्मनिर्भर भारत योजनेसाठी जीडीपीच्या १३ टक्के निधी खर्च करण्याचे जाहीर केले आहे, यातला किती निधी नेत्यांच्या प्रसिद्धीवर खर्च होणार आणि किती लाभार्थींना मिळणार हे स्पष्ट केले असते तर बरे झाले असते, अशी खोचक टिप्पणीही अजितदादांनी केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!