Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#AurangabadUpdate : औरंगाबादच्या विविध विकास कामांचे लोकार्पण समारंभ

Spread the love

पोलीस आयुक्तालयातील Command Control केंद्राचे उद्घाटन

मनपा व स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेल्या क्रांती चौक ते गोपाळ टी चौकापर्यंत तयार झालेल्या सायकल ट्रॅकचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी एकनाथ रंग मंदिर रस्त्याचा दर्जा व कामाची पाहणी करत रस्ता नियोजित वेळेत पुर्ण करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या.
यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खा. इम्तियाज जलील, आ. अंबादास दानवे, आ. संजय शिरसाट, माजी खासदार चंद्रकांत खैरे, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच मनपा आयुक्त आणि प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉ. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यासह सायकल संघटनेचे अध्यक्ष व आयर्नमॅन असलेले नितिन घोरपडे व सायकलपटु यांची उपस्थिती होती.
यावेळी आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, इम्तियाज जलील, आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सायकल पटूंसह सायकल ट्रॅकरवर सायकल चालविण्याचा आनंद घेतला. यावेळी घोरपडे यांनी सायकल ट्रॅक बनविल्याबद्दल प्रशासनाचे आभार व्यक्त केले. तसेच सायकल ट्रॅक हा पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा असून जास्तीत-जास्त नागरिकांनी सायकल चालविण्यासाठी या ट्रॅकचा वापर करावा असे आवाहनही केले.

औरंगाबाद शहर आता सी.सी.टि.व्ही.च्या निगराणीखाली

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालयातील Command Control केंद्राचे उद्घाटन पार पडले. या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरात सातशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याच्या सहाय्याने शहरातील गुन्हेगारीवर तसेच इतर घटनांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. हे सर्व कॅमेरे अद्ययावत यंत्रणेने सुसज्ज असे आहेत आणि ते स्वयंचलित आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्ण शहराचे नियंत्रण करण्यात येणार असल्याने पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी या केंद्राचे कौतुक देखील केले.

 

औरंगाबाद शहर सहा महिन्यात कचरामुक्त करण्यासाठी प्रयत्न – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

चिखलठाणा येथील 150 मे.टन घनकचरा प्रकल्पाचे लोकार्पण

विविध विकासकामांचे लोकार्पण होत आहेत, शहराच्या विकासासाठी ते महत्त्वपूर्ण आहे. शहरात तीन ठिकाणी घनकचरा प्रकल्प उभारल्यामुळे आगामी सहा महिन्यात औरंगाबाद शहर कचरामुक्त करण्यासाठी प्रयत्न होईल, असा आशावाद पर्यटन तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज व्यक्त केला.
चिकलठाणा येथे 150 मे. टन क्षमतेच्या घन कचरा प्रकल्पाचे लोकार्पण श्री. ठाकरे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी ते बोलत होते. उद्योग तथा पालकमंत्री सुभाष देसाई, रोहयो मंत्री संदिपान भूमरे, सर्वश्री आमदार अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, उदयसिंह राजपूत, विनोद घोसाळकर, चंद्रकांत खैरे, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय आदींची उपस्थिती होती.
पर्यावरण मंत्री ठाकरे म्हणाले, औरंगाबाद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. शहराच्या विकासासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून घनकचरा प्रकल्प उभारण्यात आली आहेत. स्वच्छ, सुंदर औरंगाबाद होण्यासाठी कचरा प्रकल्प उपयुक्त असून नागरिकांनीही जबाबदारीने कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. सध्या जिल्ह्यातील कोविड परिस्थिती नियंत्रणात आली आहे, मात्र ‘मिशन झिरो’ चा अवलंब करून औरंगाबादला कोविडमुक्त करावे. नागरिकांनी मास्कचा नियमित वापर, वारंवार हात धुवावेत आणि शारीरिक अंतर राखण्यासाठी सर्वांनी आग्रही राहावे , असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले.
सुरवातीला  आदित्य ठाकरे यांच्याहस्ते कोनशिलेचे अनावरण करून कचरा प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमात मंत्री श्री.ठाकरे यांच्याहस्ते मनपाच्या अधिकाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यानंतर वृक्षरोपनही करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुक्त पांडेय यांनी तर सूत्रसंचालन प्रविणा कन्नडकर यांनी केले.

 

औरंगाबादच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदत – आदित्य ठाकरे

छत्रपती संभाजी राजे मार्केट व क्रीडा संकुलाचे लोकार्पण

औरंगाबाद शहराच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येऊन निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिली.
टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी राजे मार्केट व क्रीडा संकुलाचे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी ते बोलत होते. उद्योग तथा पालकमंत्री सुभाष देसाई, रोहयो मंत्री संदिपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, सर्वश्री आमदार अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, विनोद घोसाळकर, चंद्रकांत खैरे, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय आदींची उपस्थिती होती.
आदित्य ठाकरे म्हणाले, शहरातील कचरा प्रकल्प, रस्ते विकास, सायकल ट्रॅक आदी विकासात्मक बाबींचे लोकार्पण करण्यात आलेले आहे. शहराच्या विकासात भर घालणारी ही विकास कामे असून यापुढेही शहराच्या विकासाला प्राधान्य राहील. कल्याण-डोंबिवली, नाशिक-नागपूर प्रमाणे या शहराचाही रोड मॅप तयार करण्यात यावा, अशा सूचना आदित्य ठाकरे यांनी मनपा आयुक्त पाण्डेय यांना दिल्या. त्याचबरोबर शहरातील नागरिकांनी कचरा विलगीकरण करून द्यावा. जेणेकरून शहर स्वच्छ व सुंदर राहण्यास हातभार लागेल. स्वच्छ व सुंदर, सुरक्षित औरंगाबादसाठी शासन कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.
सुरूवातीला आदित्य ठाकरे यांनी स्टेडीयमची पाहणी केली. त्यानंतर कोनशिलेचे अनावरण केले. तसेच स्टेडीयम, व्यापारी संकुलाचे फित कापून उद्घाटन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा आयुक्त श्री. पाण्डेय यांनी केले. सुत्रसंचालन प्रविणा कन्नडकर यांनी केले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!