Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कोरोना लसीकरणाचा शुभारंभ; राज्यात २८५ लसीकरण केंद्रावर तयारी पूर्ण

Spread the love

राज्यात दि. १६ जानेवारी पासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु होत आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २८५ केंद्रांवर तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक केंद्रावर १०० प्रमाणे सुमारे २८ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे.

ज्यांना लस देण्यात येणार आहे त्यांना सायंकाळपर्यत मेसेज पाठविण्याचे काम सुरू होते. या मेसेजमध्ये संबंधित व्यक्तीला किती वाजता, कोणत्या केंद्रावर, कुठल्या कंपनीची लस दिली जाणार याची माहिती देण्यात आली आहे, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

एका लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी ५ जणांचे पथक तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, लसीकरणाच्या शुभारंभ प्रसंगी देशातील अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील कूपर हॉस्पिटल, मुंबई आणि जालना जिल्हा रुग्णालयातील लसीकरण सत्राची पंतप्रधान दूरचित्रवाणीद्वारे माहिती घेतील. या दोन्ही ठिकाणी दूरचित्रवाणी संवादाची यंत्रणा तयार करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या हस्ते सकाळी होणाऱ्या शुभारंभप्रसंगी राज्यातील सर्व २८५ केंद्रांवर वेबकास्टची सोय करण्यात आली आहे.

राज्याला कोव्हीशिल्ड व्हॅक्सीनचे ९.६३ लाख डोसेस व कोव्हॅक्सिन लशीचे २०,००० डोसेस प्राप्त झालेले असून ते सर्व जिल्ह्यांपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत. कोव्हॅक्सीन लस ही राज्यातील ६ ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यामध्ये ४ वैद्यकीय महाविद्यालये (मुंबई, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर) व २ जिल्हा रुग्णालयांचा (पुणे आणि अमरावती) समावेश आहे. दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेत लसीकरण केले जाईल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!